मुंबई- देशाला महागाईचे चटके सोसावे लागत आहेत. इंधनाचे दर ही प्रतिदिन वाढत असल्याच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार फटकेबाजी केली. सार्वजनिक वाहतूकीचा टक्का घसरत असल्याने पेट्रोल, डिझेलची दरवाढ केली जात आहे. ती भल्यासाठी असल्याचा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोदी सरकारला लगावला आहे. एमएमआरडीएच्या सर्वंकष परिवहन अभ्यास अहवाल आणि कार्यशाळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की एमएमआरडीएच्या कामांना अधिक गती देण्यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करणार आहे. शहरांचा विकास करताना आपण चटई क्षेत्र निर्देशांक वाढवून देतो. पण रस्ते एकदा बांधले की बांधले, आपण त्यासाठी काही करीत नाही. कुणालाही गर्दीत आपली गाडी चालविण्याची हौस नाही. वाहतूक व्यवस्था ही शरीरातल्या रक्तवाहिन्यांसारखी आहे. रस्ते पूर्णपणे खड्डे मुक्त, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीटनेटकी व कार्यक्षम तसेच वेगवान असणे याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. कोरोना काळात बस, रेल्वेमधील प्रवासी संख्या परत वाढत चालली आहे.
हेही वाचा-Kiran Gosavi Arrest : किरण गोसावीला पुणे पोलिसांनी केली अटक; दुपारी न्यायालयात करणार हजर
पुढे मुख्यमंत्री म्हणाले की, सुविधा वाढवतांना पर्यावरणाला मारू नका. आपण खरोखरच किती आणि कसा नियोजनबद्ध विकास केला हे पाहायला पाहिजे. जिथे असा विकास झालेला नाही, तिथेही आपल्याला कर्तव्य म्हणून पाणी, रस्ते, ड्रेनेज अशा सुविधा द्याव्यात लागतात. आता मुंबईती मेट्रो स्थानके पहिली म्हणजे आपण मुंबईत आहोत की दुसऱ्या देशात, असे वाटते. कुठल्याही त्रास आणि अडथळ्याशिवाय प्रवास करण्याचे स्वप्न एमएमआरडीएच्या या नव्या अभ्यासातून पूर्ण होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा-मुंबई पोलीस करणार समीर वानखेडेंची चौकशी; चार तपास अधिकाऱ्यांचे नावे जाहीर
नागरी सुविधांवर लक्ष द्यावे - एकनाथ शिंदे
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की आपले रस्ते आपली खरी श्रीमंती दाखवतात. मुंबई आणि मुंबई महानगरच नव्हे तर राज्यात सर्वत्र उत्तम रस्ते असणे यावर प्राधान्य देण्यात आले आहे. पावसाचे प्रमाण जास्त आहे, अशा ठिकाणी रस्ते खराब होऊ नयेत म्हणून ते काँक्रीटमध्ये बांधण्याचा निर्णय झाला आहे. एमएमआरडी कडून लोकांच्या अपेक्षा वाढत आहे. महानगर क्षेत्रातील सर्व आयुक्तांनीदेखील नागरी सुविधा नागरिकांना व्यवस्थित मिळतील हे पाहणे गरजेचे आहे. सर्व करताना पर्यावरणाचा समतोल ढळू न देणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, असेही नगरविकास मंत्री शिंदे म्हणाले.