मुंबई - पुढील महिन्यात राज्यातील ग्रामपंचायत निवडणूका होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत सरकारने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा. जनतेचा विश्वास प्राप्त करा आणि ग्रामपंचायत निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे शिवसेनेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
युती ते महाविकास आघाडी
राज्यात मागील वर्षी गेले २५ वर्ष मित्र असलेल्या शिवसेना आणि भाजपाची युती तुटली. युती तुटताच शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. सरकार दोन महिन्यात पडेल असे भाजपाकडून सांगण्यात येत होते. मात्र या सरकारने नुकतेच एक वर्ष पूर्ण केले आहे. याच दरम्यान विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणूक महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी एकत्रित लढवली. त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला. सहा पैकी चार जागा महाविकास आघाडीला जिंकता आल्या. यामुळे महाविकास आघाडी म्हणून पूढील ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लाढवण्याचा विचार सरकारमधील तिन्ही पक्षांकडून केला जात आहे.
'क्रमांक एकचा पक्ष बनवा'
मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच आमदार व सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली होती. या बैठकीदरम्यान आगामी ग्रामपंचायत निवडणुकांसाठी जोमाने काम करा, लोकोपयोगी कामं करुन जनतेचा विश्वास संपादन करा, संपर्कमंत्री आणि पालकमंत्र्यांशी समन्वय राखा आणि एकजुटीने निवडणुकांना तोंड द्या, असे यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. या बैठकीत शिवसेनेला एक नंबरचा पक्ष बनवण्यासाठी सर्व निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी कामाला लागण्याचे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले होते.
'संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरा'
याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी महाराष्ट्रातील सर्व शिवसेना संपर्कप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत येऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणनिती ठरवण्यात आली. १५ जानेवारी २०२१ रोजी राज्यातील ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यातील १४ हजार २३४ गावातील ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. शिवसेना हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला पाहिजे, त्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. सर्वाधिक ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत. त्यासाठी संपर्कप्रमुखांना रणनीती आखून सतर्क केले आहे. शिवसेना पक्ष हा आता सत्तेत आहे. त्यामुळे सरकारी योजना तळागळापर्यंत पोहोचवा, असे आदेश संपर्कप्रमुखांना दिले आहेत. तसेच शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांना त्यांनी पूर्ण ताकद लावण्यास सांगितले आहे.
'भाजपाशी युती करू नका'
या बैठकीवेळी निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाशी युती करू नका. ज्या ठिकाणी शक्य असेल त्याठिकाणी राष्ट्रवादी, काँग्रेसला सोबत घेऊन निवडणुका लढवता येतील का याची चाचपणी करण्याचे आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे समजते.
जिल्हानिहाय ग्रामपंचायतींची संख्या-
ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.