मुंबई - ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या घरावर झालेल्या या अचानक हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय ( MH CM on silver oak attack ) आहे. अशा प्रकारे जबाबदार असणाऱ्यांवर तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना ( Uddhav Thackeray order to police ) दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) म्हणाले, की एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलन करीत असले तरी राज्य सरकारने कधीही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले ( Mahavikas Aghadi help to ST ) नाही. महामंडळाचा कर्मचारी आमचाच आहे, या भावनेतून जितके जास्तीत जास्त आर्थिक व सेवाविषयक लाभ देता येतील ते आम्ही दिले. मुंबई उच्च न्यायालयात याविषयीची माहिती वेळोवेळी सादर केली. न्यायालयानेसुद्धा त्याची नोंद घेतली आहे. एसटीच्या आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांनीदेखील याचे स्वागत केल्याच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहचल्या आहेत.
चिथावणी देणाऱ्यांवर कायद्याने कडक कारवाई करा-अचानक आज दुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी एक जमाव पोहचून त्याने घोषणाबाजी करतो व दगडफेक, चप्पलफेक करतो ही कृती अतिशय अनुचित व कुणालाही न पटणारी आहे. अशा प्रकारे हिंसेला उद्युक्त किंवा प्रक्षोभ निर्माण करणाऱ्यांवर तसेच चिथावणी देणाऱ्यांवर कायद्याने कडक कारवाई झाली पाहिजे, अशा सूचना गृहमंत्र्यांना दिल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांच्या संसाराच्या राखेवर कुणी आपल्या पोळ्या भाजू नयेत -नेत्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या घरांवर हल्ले करणे हा पायंडा महाराष्ट्राने कधीही पाडलेला नाही. या निंदनीय घटनेला प्रत्युत्तर म्हणून कुणीही कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहचेल असे कृत्य करू नये. एसटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या भल्यासाठी नेहमीच सरकार त्यांच्याबरोबर राहील. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या संसाराच्या राखेवर कुणी आपल्या पोळ्या भाजू नयेत असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.