महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'वांद्रे-वर्सोवा आणि वर्सोवा-विरार सागरी सेतू मार्ग 2025 पर्यंत पूर्ण करणार' - Uddhav Thackeray directions on sea link project

वांद्रे वर्सोवा हा सी लिंक हा 9.6 किमी आहे. या मार्गामुळे वाहतूक कोंडी सुटून इंधनाची बचत होणार आहे. तसेच प्रवासाचा वेळ वाचणार आहे.

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

By

Published : Jan 12, 2021, 11:51 PM IST

मुंबई -वांद्रे-वर्सोवा सी लिंक आणि वर्सोवा-विरार सी लिंक हा सागरी महामार्ग सन 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी सोमवारी आढावा घेतला. प्रकल्पाच्या कामांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.


वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विविध विकासकामांबाबत आढावा बैठक घेण्यात आला. यावेळी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दोन प्रकल्पांचे सादरीकरण मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समोर केले. जुहू कोळीवाडा बाह्य मार्ग आणि वर्सोवा येथून पुढे हा मार्ग पश्चिम द्रुतगती मार्गाला जोडण्याची सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केली. मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच सुखकर प्रवास होण्यासाठी हे दोन्ही प्रकल्प महत्त्वाचे आहेत.

हेही वाचा-हेही वाचा-वर्सोवा-बांद्रा सागरी सेतूचा मार्ग सुकर, 9 खांबांच्या बांधकामावरील स्थगिती उठवली

वाहतूक वेगवान होणार -
वर्सोवा-विरार या सुमारे 42.75 किमी लांबीच्या सागरी मार्गाचा अहवाल पूर्ण करण्यात आला आहे. वर्सोवा ते वसई आणि वसई ते विरार या दोन टप्प्यात या प्रकल्पाचे काम होणार आहे. सागरी किनाऱ्याला समांतर असणाऱ्या या सागरी सेतूमुळे वर्सोवा ते विरार या मार्गावरील वाहतूक वेगवान होणार आहे. हा सागरी मार्ग बांधताना पर्यावरणविषयक सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. मच्छिमारांच्या कामांना हानी पोचणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. चार ठिकाणी मच्छिमार नौका व इतर नौकांची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी नेव्हिगेशन स्पॅन देण्यात येणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. वर्सोवा –विरार सागरी सेतू मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येण्याची मुख्यमंत्र्यांनी सूचना केली. या दोन्ही सागरी सेतू मार्गामुळे या भागातील अर्थव्यवस्थेला उभारी मिळणार आहे. तसेच रोजगार संधी वाढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

हेही वाचा-आज मुंबईत लस येणार! रात्री 12 नंतर मुंबईसाठी कोल्डस्टोरेज कंटेनर निघण्याची शक्यता

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी प्रकल्पांचे सादरीकरण केले. यावेळी मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (बांधकामे) अनिलकुमार गायकवाड आदी उपस्थित होते.

वर्सोवा ते बांद्रा सागरी सेतूच्या निर्मितीवरील स्थगिती हटली-

एमएसआरडीसीच्या वर्सोवा ते बांद्रा सागरी सेतूच्या निर्मिती कामांसाठी मुंबई उच्च न्यायालयाने लादलेली स्थगिती डिसेंबरमध्ये हटवण्यात आली आहे. त्यामुळे एमएसआरडीसीला आता या ठिकाणी नऊ खांबांसाठी खारफुटी तोडून पुन्हाकाम सुरू करता येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details