मुंबई: निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह (Shivsena Symbol) गोठवल्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या गटासाठी संभावित नाव आणि चिन्ह ठरवल्याची माहिती समोर आली आहे. चिन्हांमध्ये हिंदू धर्माशी निगडीत असलेले त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन पर्याय सुचवले गेले आहेत. तर गटाच्या नावासाठी 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे', 'शिवसेना प्रबोधनकार ठाकरे', 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे तीन पर्याय सुचवले आहेत. आपल्या मातोश्री या निवासस्थानी ठाकरेंनी बैठक बोलावली असून या बैठकीत अंतिम निर्णय होऊन सोमवारी नाव व चिन्ह आयोगाकडे सादर केले जाणार आहे.
नव्या चिन्हाचा शोध सुरू: अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठावले. राज्यात यावरुन आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. निवडणूक आयोगाने सोमवार पर्यंत चिन्ह आणि पक्षाच्या नावाचा विचार करण्याची मुदत दिली आहे. त्यानुसार शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाकडून नव्या चिन्हाचा शोध सुरू आहे.
या संदर्भात शिवसेनेचे खासदार अरविंद सावंतपत्रकारांशी बोलताना म्हणाले, "निवडणूक आयोगाने आमचे चिन्ह गोठवले आहे. त्यांनी आम्हाला चिन्हे देण्यास सांगितले त्यानुसार उद्धव ठाकरेंनी 'त्रिशूल', 'मशाल' आणि 'उगवता सूर्य' ही तीन चिन्हे आयोगाला दिली आहेत. निवडणूक आयोग आता चिन्ह वाटपाचा निर्णय घेईल"
"आमच्या पक्षाचे नाव शिवसेना आहे. जर निवडणूक आयोगाने 'शिवसेना (बाळासाहेब ठाकरे)', 'शिवसेना (प्रबोधनकार ठाकरे)' किंवा 'शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)' यांसह शिवसेनेशी संबंधित कोणतेही नाव दिले तर ते आम्हाला मान्य आहे." - खासदार अरविंद सावंत, शिवसेना (उद्धव गट)
सोमवारी निर्णय: केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सध्याच्या घडीला 197 निवडणूक चिन्ह उपलब्ध आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला यापैकी तीन चिन्हाचा पर्याय दिला जावू शकतो. आता दोन्ही गट कोणते चिन्ह घेतात हे सोमवारी समोर येणार आहे. दोन्ही त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारे चिन्ह निवडू शकतात. पोटनिवडणुकांसाठी दोन्ही गटांना 10 ऑक्टोबर दुपारी 1 वाजेपर्यंत हे सादर करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.