मुंबई -राज्यात असलेले महाविकास आघाडी सरकार शिवसेनेमध्ये ( Shiv Sena ) झालेल्या बंडानंतर पाय- उतार झाले आहेत. शिवसेनेच्या 40 आमदारांनी आपल्याच पक्षाच्या विरोधात बंड केल्याने उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना मुख्यमंत्री ( CM ) पदावरून पाय- उतार व्हावे लागले आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारला. भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने एकनाथ शिंदे यांनी आपले सरकारही स्थापन केले आहे. मात्र, ही सर्व उलथापालथ होत असतानाही सोबत असलेल्या 15 आमदारांनी न डगमगता उद्धव ठाकरे यांची साथ दिली आहे. या 15 आमदारांना उद्धव ठाकरे यांनी भावनिक पत्र लिहिले आहे. या 15 निष्ठावान आमदारांनी आपल्याला साथ दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहे.
आपल्या पत्रात उद्धव ठाकरे म्हणतात..-"आईच्या दुधाशी कधीही बेइमानी करू नका. हा बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला मंत्र जपत तुम्ही शिवसेनेसोबत निष्ठावान राहिलात. कोणत्याही धमक्या आणि प्रलोभनांना बळी न पडता आपण एकनिष्ठ राहिलात आणि शिवसेनेला बळ दिलेत. आई जगदंबा तुम्हास निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना" असल्याचे आपल्या पत्रातून उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. "शिवसेना हा एक विचार आहे. बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहेत. निष्ठा आणि अस्मितेची महती आपल्याला बाळासाहेबांनी शिकवली. शिवसेनेचे आमदार म्हणून, तुम्ही केलेले निष्ठेचे पालन यातून बाळासाहेबांच्या विचारांचे तुम्ही पाईक आहात", हे दाखवून दिले असल्याचे पत्रातून उद्धव ठाकरे म्हणाले आहे.