मुंबई- दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कुलाबा ते सीप्झसाठीच्या मेट्रो रेल्वे डब्यांची चाचणी मरोळ मरोशी येथे केली जाणार आहे. ही चाचणी करताना आरेतील एकाही वृक्षाला धक्का लागू नका, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
मुंबई येथील वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी व प्रदूषण कमी करण्यासाठी कुलाबा ते सीप्झ या मार्गावर मेट्रो लाईन-३ चे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गिकेकरिता अल्स्टॉम या कंपनीने श्रीसिटी आंध्रप्रदेश येथे ८ डब्यांची ट्रेन तयार केलेली आहे. या गाडीची त्या ठिकाणी तांत्रिक चाचणी झालेली आहे. प्रत्यक्षात याची चाचणी मुंबई येथे १० हजार किमी मेट्रो चालवून घेण्यात येणार आहे. त्यानंतर कुलाबा ते सीप्झ या मार्गिकेवरदेखील ट्रेन चालविण्यात येणार आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर अशा पध्दतीच्या ३१ ट्रेन या मार्गावर धावण्याकरिता उपलब्ध होणार आहेत.
हेही वाचा-Maharashtra Rain : मराठवाड्यातील शेतकऱ्यांनो धीर सोडू नका.. सरकार तुमच्या पाठिशी, आपत्तीतून बाहेर काढू - मुख्यमंत्री
झाड न तोडण्याच्या सूचना-
मरोळ मरोशी या रस्त्याच्या भुयारी मार्गाचे काम चालू आहे. या कामाच्या जवळच रॅम्प बनवून काम हाती घेण्यात येणार आहे. या चाचणीच्या कामाकरिता कोणतेही झाड तोडण्यात येणार नाही, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
दरम्यान एकीकडे आरे कारशेडला विरोध केल्यानंतर चाचणीसाठी परवानगी दिल्याने मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा-रस्त्यांसाठी आवश्यक निधी देणार, कामचुकार कंत्राटदारांची गय करणार नाही, मुख्यमंत्र्यांचा इशारा
आरेवर बिल्डरांचा 'डोळा'? -
मागील 25 ते 30 वर्षात मुंबईचा झपाट्याने विकास झाला आहे. सिमेंटची जंगले उभी करण्यात आली आहेत. दुसरीकडे आता मुंबईत गृहनिर्मितीसाठी वा इतर विकास कामासाठी जागा नाही. अशावेळी मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरे जंगलावर बिल्डर आणि सरकारची वक्रदृष्टी पडल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींकडून सातत्याने करण्यात येत आहे. तर यातूनच आरेमध्ये मेट्रो कारशेड, एसआरए, राणी बाग विस्तारीकरणासह अनेक प्रकल्प आणण्यात आले आहेत. या प्रकल्पाच्या नावाखाली येथील जागेचा हळूहळू व्यवसायिक वापर करण्याचा डाव असल्याचा आरोप केला जात आहे.
हेही वाचा-सुदृढ आरोग्यासाठी अन्न सुरक्षा महत्वाची - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रतिपादन
महाविकास आघाडीने पहिल्याच दिवशी मेट्रो कारशेडच्या कामाला दिली होती स्थगिती
महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पहिल्याच दिवशी बहुचर्चित आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली होती. या कारशेडबाबत अभ्यास करण्यासाठी ४ जणांची समिती नेमण्यात आली होती. आरेमधून मेट्रो कारशेड अन्य ठिकाणी नेता येईल का? याबाबत ही समिती सरकारला अहवाल सादर करणार होती. यासाठी सनदी अधिकारी मनोज सौनिक यांनी अंतिम अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला होता.