मुंबई - वंचितांची म्हणून जी काही आघाडी निर्माण झाली आहे त्याविषयी न बोललेलेच बरे. निवडणुकीपुरत्या उगवलेल्या त्यांच्या छत्र्या निकालानंतर अदृश्य झालेल्या दिसतील, अशी टीका शिवसेनेच्या मुखपत्रातून करण्यात आली आहे.
वंचित आघाडी निवडणुकीपुरत्या उगवलेल्या छत्र्या, निकालानंतर होतील अदृश्य - शिवसेना - criticize
या वेळी राज्यात 48 पैकी किमान 45 जागा आम्ही नक्कीच जिंकू. विरोधक निदान औषधासाठी तरी शिल्लक ठेवायला हवेत, म्हणून आम्ही 3 जागा महाआघाडीवाल्यांना देत आहोत. आता या 3 जागा कोणत्या, ते निकालानंतरच कळेल, अशी अपेक्षा शिवसेनेने त्यांच्या मुखपत्रातून व्यक्त केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकांच्या तारखा जवळ येत आहेत. कुणी ‘कॉलर’ उडवीत भाषण ठोकीत आहेत तर कुणी मतांसाठी भररस्त्यात ‘नाचू’ लागले आहेत. पुढला महिनाभर मतदार हा ‘राजा’ असेल आणि पंतप्रधान, मुख्यमंत्री, विरोधी पक्षांचे नेते, गावोगावचे जाणते राजे हे मतदारांसमोर असे काही वाकलेले आणि झुकलेले दिसतील की विनम्रता या शब्दाची व्याख्याच बदलावी लागेल.
मोदी यांच्या तोडीचा एक तरी नेता ‘महागठबंधन’मध्ये का? देव, देश आणि धर्मासाठी म्हणूनच आम्ही ‘युती’ केली व तो आमचा निर्णय योग्यच होता, हे कोल्हापुरातील उसळलेल्या विराट सभेने दाखवून दिले. महाराष्ट्राच्या पाठिंब्यावर देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच सरकार येईल, याविषयी आमच्या मनात कोणतीही शंका नसल्याचे लेखात म्हटले आहे.