मुंबई - मराठी माणसाने रक्त सांडून मुंबई मिळवलेली आहे. आता ती तोडण्याचे मनसुबे रचले जात आहेत. त्यांच्या पोटात असलेले ओठावर आले आहे. मात्र, मुंबईचा ( Uddhav Thackeray news Mumbai bkc ) लचका तोडणाऱ्यांचे तुकडे केल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा घणाघात शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray on Mumbai ) यांनी आज मुंबईतील बीकेसी मैदानात झालेल्या विराट जाहीर सभेत केला.
हेही वाचा -Uddhav Thackeray's meeting : हिंदुत्व, विकास आणि शिवसेना
यावेळी मुख्यमंत्र्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य करणार्या भाजप - मनसेचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. काश्मिरी पंडित, बाबरी मशीद, भोंगे आदी विषयांवर परखड भाष्य करत त्यांनी चौफर फटकेबाजी केली.
टिनपाटांना केंद्राची सुरक्षा - भाजपावर मुख्यमंत्र्यांनी आज जोरदार हल्ला चढविला. कोणाच्या हातात भोंगा द्यायचा, हनुमान चालीसा लावायची आणि पत्रकार परिषद घेवून टॉमॅटो बसतात, अशी टीका किरीट सोमय्या यांचे नाव न घेता त्यांनी केली. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकविणारे कोण, असा सवाल त्यांनी केला. भोके पडलेल्या टिनपाटांना केंद्राची सुरक्षा दिली जात आहे, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी भाजपावर चढविला. बाबरी मशीद पाडली तेव्हा तुमचे वय काय होते, तुम्ही बाबरी मशिदीवर चढला असता तर तुमच्या वजनाने ती मशीद पडली असती, अशी खोचक टीका मुख्यमंत्री यांनी फडणवीस यांच्यावर केली. आज ईडी लावून घोटाळेबाजांना पवित्र केले जात आहे. उद्या ते दाऊदलाही मंत्री बनवून पवित्र करतील, असे उपहासाने उद्धव ठाकरे म्हणाले.
अडीच वर्षांपूर्वी गाढवाला लाथ मारली - आमचे हिंदुत्व देवळात घंटा बडवणारा नाही अतिरेक्यांना बडवणारा आहे. आमचे हिंदुत्व गदाधारी. गाढवाने लाथ मारायच्याआधी आम्हीच लाथ घातली. आज एक भ्रम निर्माण केल्या जात आहे की, हिंदुत्वाचे रक्षक भाजपच. इथे जमलेला हिंदू हा मेल्या आईचे दूध पिलेला नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
युतीत सडलो -आमची युतीत २५ वर्षे सडली. आज विश्वास बसत नाही. किती वाईटपणाने समोर येतय. सामनात जे येते ते देशाच्या हिताचे. वाजपेयी पेट्रोल दरवाढ झाल्यावर बैलगाडीतून संसदेत गेले होते. तो संवेदनशील भाजप कुठे आहे?