मुंबई -एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठे बंड करून शिवसेनेचा मोठा गट फोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. भाजपनेते देवेद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी अटकळ बांधली जात असतानाच भाजपने संख्याबळ जास्त असूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा मान दिला. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, त्याला उद्धव ठाकरे यांनी आज आक्षेप घेतला. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी आज म्हटले.
मुंबईवर राग नको -एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी होत असल्याचे दिसल्याने अखेर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आज प्रथमच उद्धव ठाकरे शिवसेना भवनात ( Shivsena Bhavn ) आले होते. शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत त्यांनी माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका, असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी आज विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांच्या सरकारला केलं आहे. नव्या सरकारने सत्तेवर येताच आरेमधून कांजूरमार्गला नेलेले कारशेड पुन्हा आरेमध्येच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारला हे आवाहन केलं आहे.
मी आधीच सांगितलं होतं - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून मानण्यास त्यांनी साफ नकार दिला. तसंच भाजपनं हे आधीच केलं असतं तर राज्यात महाविकास आघाडीची गरजच पडली नसती, असंही ते म्हणाले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "काल जे काही घडलं ते मी अमित शहांना आधीच सांगितलं होतं. भाजप-शिवसेना युतीत आम्हाला अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा होता. त्यांनी आधी तयारी केली असती तर या महाविकास आघाडीच्या प्रयोगाची गरजच पडली नसती."
माझ्या खंजीर खुपसलात मुंबईकरांच्या नको -मेट्रो शेड प्रकल्पाची जागा बदलण्याबाबत झालेल्या चर्चेवर उद्धव ठाकरे यांनीही आपले मत मांडले. गुरुवारी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच पहिली कॅबिनेट घेतली. या बैठकीत त्यांनी आरे येथील मेट्रो कार शेड व जलयुक्त शिवार योजनेच्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात करा, असे आदेश दिले. यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, "माझा राग मुंबईकरांवर काढू नये. मेट्रो शेडच्या प्रस्तावात बदल करू नका. मुंबईच्या वातावरणाशी खेळू नका. आम्ही कंजूर मार्गचा पर्याय सुचवलेला आहे तोच पुढे चालू ठेवा. आता तर केंद्रात आणि राज्यात देखील तुमचंच सरकार आहे."