मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो कारशेडसारख्या प्रकल्पांना स्थगिती देण्याचे आदेश देऊन राज्याची 'इनव्हेस्ट्मेंट अनफ्रेंडली' प्रतिमा निर्माण केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. झाडे तोडल्याशिवाय एकही पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण होऊ शकत नाही, असे एका मराठी दैनिकाशी बोलताना फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, आरेमध्ये आम्ही सुमारे २ हजार झाडे तोडली खरी, पण त्यापूर्वी चार वर्षांपूर्वी आम्ही जवळजवळ २३ हजार रोपे लावली असून ती जिवंत आहेत. त्यानंतरही आणखीन २५ हजार रोपे लावली जात आहेत. उद्योगक्षेत्रातील लोक आता विचार करीत आहेत की, महाराष्ट्र अजूनही गुंतवणुकीसाठी अनुकूल आहे की नाही. त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र सरकारने गुंतवणुकीसाठी राज्याची अनुकूलता नसल्याचा संदेश देऊ नये.