मुंबई - राज्यातील विद्यापीठ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू केल्या जाणार आहेत. तसेच या परीक्षांचे निकाल 31 ऑक्टोबरपर्यंत जाहीर केले जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज राजभवन येथे दिली.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज राजभवन येथे राज्यातील कुलगुरू आणि उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर सामंत यांनी ही माहिती दिली आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षांचं ठरलं..! ऑक्टोबरच्या सुरुवातीला परीक्षा, तर महिनाअखेरीस निकाल - minister uday samant news
राज्यातील कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन परीक्षा घेण्यासंदर्भातील नियोजन करण्यासाठी, उद्या आपत्ती व्यवस्थापनासोबत एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. यानंतरच विद्यापीठांमध्ये परीक्षा कशा प्रकारे घेता येतील, याचा निर्णय घेतला जाणार आहे.
'परीक्षेसंदर्भात आम्ही घेतलेल्या निर्णयावर राज्यपालांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली. विद्यार्थ्यांना घरी बसूनच ही परीक्षा देता येईल, यासाठी आम्ही मांडलेल्या प्रस्तावावर राज्यपालांनी होकार दर्शवला, यामुळे या परीक्षा सुरळीत होतील.' असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला. 15 सप्टेंबरपासून राज्यातील विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या प्रात्यक्षिक परीक्षांना सुरुवात होईल. मात्र, या परीक्षांना कोणत्याही विद्यार्थ्यांना विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये येण्याची गरज पडणार नाही. त्यांना घरूनच प्रात्यक्षिक परीक्षा कशा देता येतील यावर लवकरच निर्णय घेणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.
हेही वाचा -'नो जॉब, नो वोट... मोदीजी रोजगार द्या'; ट्विटरवर युवक आक्रमक