मुंबई - गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांनी भाजपला गोव्यामध्येच (Goa BJP) नाहीतर, देशपातळीवर एक वेगळी उंची मिळवून दिली. मात्र, आज ते हयात नसताना त्यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांना भाजप (BJP) तिकीट नाकारते हे दुर्दैव आहे. त्यामुळे होणाऱ्या गोव्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये (Goa Assembly Election 2022) याचे परिणाम भाजपला दिसतील, असे वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी केले आहे. तसेच गोव्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती झाली असून, गोव्याची जनता या युतीवर विश्वास दाखवेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.
माहिती देताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत - गोव्यात प्रचारासाठी जोरदार तयारी-
गोव्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. प्रचारासाठी राज्यातून दिग्गज नेते जाणार आहेत. मंत्री उदय सामंत हेदेखील 24 आणि 25 जानेवारीला गोव्यामध्येचा प्रचारासाठी जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे एक जानेवारीनंतर गोव्यामध्ये प्रचारासाठी जाणार असल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली.
- कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या ठिकाणी महाविद्यालय सुरू करण्यावर कल -
राज्यातील महाविद्यालय आणि विद्यापीठ सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला आहे. लवकरच ते याबाबतचा निर्णय घेतील. त्यानंतर राज्यातील कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन महाविद्यालय आणि विद्यापीठ सुरू केले जातील. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या ठिकाणी विद्यापीठ आणि महाविद्यालय सुरू करण्यावर कल आहे. पण जिल्हाधिकारी पातळीवर याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.