महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दिलासादायक! मुंबईतील 'त्या' ५ रुग्णांपैकी २ रुग्ण कोरोनामुक्त - mumbai corona latets news

नवा स्ट्रेन अत्यंत घातक आहे. याचा शिरकाव झाल्यास त्याला रोखणे अवघड आहे. त्यामुळे या संकटाची गंभीर दखल घेत मुंबई महानगर पालिकेने योग्य त्या कडक उपाययोजना केल्या आहेत. ब्रिटन-युरोपमधून आलेल्याना क्वारंटाइन करत त्यांची टेस्ट करणे तसेच त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे मोठे फायद्याचे ठरले आहे.

two out of five patients in Mumbai are tests negative for new coronavirus strain
दिलासादायक! मुंबईतील 'त्या' ५ रुग्णांपैकी २ रुग्ण कोरोनामुक्त

By

Published : Jan 4, 2021, 11:55 PM IST

मुंबई - राज्यात नव्या स्ट्रेनचे ८ रुग्ण आढळले असून यातील ५ रुग्ण मुंबईतील असल्याचे समोर आले आहेत. मात्र, या ५ रुग्णांपैकी २ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. या रुग्णांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, मुंबई महानगर पालिका यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे. हे ५ रुग्ण अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल आहेत. नव्या स्ट्रेनला रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचेही काकाणी यांनी सांगितले आहे.

एकूण ३० प्रवासी आतापर्यंत आढळले कोरोना पॉझिटिव्ह -

नव्या स्ट्रेनला रोखण्यासाठी ब्रिटनची विमान सेवा बंद करण्यात आली आहे. तर ब्रिटन आणि युरोपवरून आलेल्यांना तात्काळ क्वारंटाइन केले जात आहे. त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत ब्रिटन आणि युरोपवरून आलेल्यांपैकी २६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर ४ जण संपर्कात आलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. या सगळ्याचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) पुणे यांच्याकडे पाठवण्यात आले आहेत. यातीलच ५ जण आज नव्या स्ट्रेनचे रुग्ण असल्याचे एनआयव्हीच्या अहवालातुन स्पष्ट झाल्याचे काकाणी यांनी सांगितले आहे.

५ जणांच्या संपर्कात आले होते ४० जण -

नवा स्ट्रेन अत्यंत घातक आहे. याचा शिरकाव झाल्यास त्याला रोखणे अवघड आहे. त्यामुळे या संकटाची गंभीर दखल घेत मुंबई महानगर पालिकेने योग्य त्या कडक उपाययोजना केल्या आहेत. ब्रिटन-युरोपमधून आलेल्याना क्वारंटाइन करत त्यांची टेस्ट करणे तसेच त्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे मोठे फायद्याचे ठरले आहे. या ५ जणांच्या संपर्कातील ४० जणांना शोधून काढत त्यांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. सुदैवाने यातील कुणीही अद्याप कोरोना पॉझिटिव्ह आलेले नाही, असेही काकाणी यांनी सांगितले आहे.

ब्रिटनवरून आलेल्या २६ पैकी १४ रुग्ण झाले बरे -

ब्रिटनवरून आलेल्या कोरोना कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना एकाच ठिकाणी उपचार देण्याच्या दृष्टीने त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. तिथे त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. त्यानुसार येथे उपचार घेणाऱ्यांमधील ब्रिटन-युरोपवरून आलेल्या २६ कोरोना पॉझिटिवपैकी १४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. या कोरोनामुक्त रुग्णांमध्येच नव्या स्ट्रेनच्या २ रुग्णांचाही समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या या रुग्णांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

नव्या स्ट्रेनच्या रुग्णांच्या डिस्चार्जबाबत एक नियमावली तयार करण्यात येईल. त्यानुसार या २ जणांबरोबर उर्वरित १२ कोरोनामुक्त झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात येईल असेही काकाणी यांनी सांगितले आहे. तर आता एनआयव्हीकडून आणखी काही अहवाल येणे बाकी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे थोडी धाकधूक आहे, पण नव्या स्ट्रेनचे रुग्ण लवकर बरे होते असल्याने ही दिलासादायक बाब आहे. तर त्यांना आणि त्यांच्या संपर्कातील लोकांना वेळीच क्वारंटाइन करण्यात आल्याने पुढचा मोठा धोका रोखला गेला आहे हे विशेष. तर यापुढे ही परदेशातून येणाऱ्यासाठीच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा - सरपंचपदाचे लिलाव निवडणूक आयोगाच्या रडारवर

ABOUT THE AUTHOR

...view details