मुंबई - एकीकडे गणेश विसर्जन सुरू असताना अनंत चतुर्दशी दिनी रात्री ९ च्या सुमारास ५ मुले समुद्रात बुडाली. त्यापैकी २ जणांना वाचवण्यात यश आले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ मुलगा अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.
5 मुले बुडाली -
मुंबईत गणेश विसर्जन शांततेत पार पडत असताना रविवारी रात्री ९ च्या सुमारास विसर्जनदरम्यान ५ मुले वर्सोवा जेट्टी येथे गेली होती. समुद्रात ही पाचही मुले बुडाली. मुले समुद्रात बुडाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी व गावकऱ्यांनी शोध घेतला असता शिवम रंजनलाल निर्मळ (१९) आणि विजय रोहिदास मराठे (१८) या २ जणांना शोधण्यात यश आले आहे. शिवम याच्यावर एचबीटी रुग्णालयात तर विजय याच्यावर कोकिळाबेन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मुले समुद्रात बुडाल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, नेव्हीचे डायव्हर्स, लाईफ गार्ड यांनी शोध मोहीम राबवली. समुद्रात ज्या ठिकाणी मुले बुडाली त्या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरात फेरी बोट वापरून शोधकार्य सुरू केले. मात्र त्या ३ मुलांचा शोध सोमवारी पहाटे पर्यंत लागला नव्हता.