मुंबई -आर्यन खान प्रकरणात ( Aryan Khan Cruise Drug Case ) मुंबई एनसीबीचे दोन अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे. आर्यन खान प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी व्ही व्ही सिंग आणि इंटेलिजंट ऑफिसर आशिष रंजन प्रसाद असे निलंबन झालेल्या अधिकाऱ्यांचे नाव ( Mumbai NCB Officers Suspended ) आहे. या अधिकाऱ्यांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्याने ही निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे. तसेच निलंबनाच्या काळात व्ही व्ही सिंग यांना NCB गुवाहाटी मुख्यालात रिपोर्ट करण्याचे आदेश आहे.
तपासात आढळले दोषी : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आले होते. यानंतर या प्रकरणात तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अनेक आरोप झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास दिल्ली SIT एनसीबीला देण्यात आला होता. या प्रकरणाचे वरिष्ठ तपास अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांना तपासादरम्यान अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी आल्यानंतर प्रकरणाचा तपास केल्यावर दोषी आढळल्याने आज या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
नवाब मालिकांनीं केले होते आरोप : एनसीबी अधिकारी आशिष रंजन प्रसाद आणि व्ही. व्ही. सिंग अशी निलंबन करण्यात आलेल्या दोन एनसीबी अधिकाऱ्यांची नावं आहेत. कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या तपास पथकात या दोन अधिकाऱ्यांचाही समावेश होता. याप्रकरणी एनसीबीवर आरोप होत असताना याप्रकरणी बऱ्याच तक्रारी ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे आल्या होत्या. एनसीबी चुका करत आहे बऱ्याच गुन्ह्यांमध्ये एनसीबीकडून योग्य तपास होत नाही असे बरेच आरोप नवाब मलिकांनीही केले होते.
अहवालाच्या आधारे कारवाई : सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर सिंह यांच्याकडे जो अहवाल आला होता यामध्ये या दोन अधिकाऱ्यांची नावं होती. या अहवालाच्या आधारेच या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र कोणत्या आरोपांमुळं त्यांच्यावर कारवाई केली गेली, हे अद्याप समोर आलेलं नाही.
नेमकं प्रकरण काय? :मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी कार्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरु असल्याचे उघडकीस आलं होतं. या ठिकाणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती. आर्यन खान हा 27 दिवस जेलमध्ये रहाव लागलं होतं. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे व्हाट्सअॅप चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचंदेखील नाव आहे. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचं एनसीबी अधिकाऱ्यांच म्हणणं आहे. या दोघांतील व्हाट्सअॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केला होता. त्यामुळे आर्यनला जामीन मिळण्यास अडचण झाली होती. मुंबई विशेष न्यायालयाने आर्यन खानचा जामीन फेटाळून लावला होता. मात्र त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानने जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर तीन दिवस सुरू असलेल्या युक्तिवादानंतर अखेर आर्यन खानला जामीन मंजूर झाला होता.