मुंबई - सुमन नगर येथे पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करताना पालिकेच्या पाणी विभागातील दोन कर्मचाऱ्यांचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. तर इतर पाच कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी कामगार संघटनांकडून केली जात होती. त्याची दखल घेत चौकशी करून त्याबाबतचा 'चौकशी अहवाल' येत्या १५ दिवसात सादर करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी जल अभियंता खात्याला दिले आहेत.
हेही वाचा -केंद्राकडून मदत घेणे त्यामध्ये गैर काय? ती तर त्यांची जबाबदारीच - ठाकरे
मुंबईच्या कुर्ला पूर्व सुमन नगर येथील ट्रॅफिक चौकीजवळ पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी पालिकेच्या पाणी विभागातील सात कर्मचारी गेले होते. पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करत असताना त्यात विद्युत प्रवाह वाहून शॉक लागल्याने हे सातही कर्मचारी जखमी झाले. त्यांना तातडीने पालिकेच्या घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर इतर पाच कर्मचाऱ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.