मुंबई - मुंबईत गेले वर्षभर कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम (Corona Vaccination) सुरु आहे. या मोहिमे अंतर्गत २ कोटी डोसचा महत्त्वाचा टप्पा मुंबईने गाठला आहे. या कामगिरीमध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका व खासगी लसीकरण केंद्रांवरील लसीकरणाचा समावेश आहे. कोविड लसीची पहिली आणि दुसरा डोस तसेच बूस्टर डोसचा देखील त्यात समावेश आहे. महानगरपालिकेच्या या कामगिरीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अभिनंदन केले आहे.
लसीकरण मोहीम -
मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रसार सुरु झाला. हा प्रसार रोखण्यासाठी मुंबईसह देशभरात १६ जानेवारी २०२१ पासून कोविड - १९ प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरु झाली. टप्प्या-टप्प्याने या मोहिमेची व्याप्ती वाढविण्यात आली. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱयांसाठी लसीकरण सुरु झाले. त्यानंतर फ्रंटलाईन कर्मचाऱयांसाठी ५ फेब्रुवारी, ६० वर्ष वयावरील तसेच ४५ ते ५९ वयोगटातील सहव्याधी असलेल्या नागरिकांसाठी १ मार्च, ४५ वर्ष वयावरील सर्व नागरिकांसाठी १ एप्रिल, १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी १ मे पासून लसीकरण सुरु करण्यात आले. नुकतेच दिनांक ३ जानेवारी २०२२ पासून वयवर्ष १५ ते १८ वयोगटातील युवकांचे लसीकरण सुरु झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून सर्व समाज घटकांपर्यंत पोहोचून सर्वाधिक वेगाने लसीकरण करण्यात मुंबई आघाडीवर आहे. समाजातील कोणताही घटक लसीकरणातून वंचित राहणार नाही, याची पुरेपूर दक्षता प्रशासन घेत आहे.