मुंबई -सायन अँटोप हिल सीजीएस कॉलनी येथे उद्यानात महापालिकेचे पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू होते. या कामादरम्यान खणण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी घडली. याठिकाणी सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती अँटोपहिल पोलीसांनी दिली.
2 मुलांचा मृत्यू -
मिळालेल्या माहितीनुसार अँटोप सी जी एस कॉलनी, सेक्टर 7 येथील उद्यानात पाईपलाइन दुरुस्तीकरता खड्डा खणण्यात आला होता. या खड्ड्यात पाणी साचून तेथे पाण्याचे डबके बनले होते. या मैदानात खेळण्यास आलेली दोन मुले सोमवारी दुपारी 3 वाजून 45 वाजताच्या दरम्यान या डबक्यात पडली. डबक्यात पडलेल्या या दोन्ही मुलांना बाहेर काढून सायन रुग्णालय, मुंबई येथे उपचाराकरता नेले असता डॉक्टरांनी दोन्ही मुलांना मृत घोषित केले. यशकुमार आलोककुमार चंद्रवंशी (वय 12 वर्षे) व शिवम विजय जैस्वाल (वय 9 वर्षे) अशी या दोन्ही मुलांची नावे आहेत.