ठाणेमुंबईत लुटीच्या घटनेनंतर तीन अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटले होते. या तिघांपैकी दोघांनी कल्याणमध्ये येऊन एका वयोवृद्ध महिलेचे दागिने हिसकावून फरार झाले होते. अखेर दोन्ही चोरट्यांना कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी ( Khadakpada Police ) बेड्या ठोकत त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस आणले आहेत. खळबळजनक बाब म्हणजे मुंबईत नाकाबंदी सुरु असताना पोलिसांवर हल्ला करत पळून गेल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले होते. या गुन्हेगारांकडून चैन स्नॅचिंग आणि दुचाकी चोरीच्या एकूण १८ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. सुनील उर्फ सोन्या शंकर फुलोरे (२०), गणेश नागनाथ जाधव (२६) असे अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.
या ठिकाणी सापळा लावला कल्याण नजीक आंबिवली येथे राहणाऱ्या लता साठे (५२) पहाटे पाच वाजता आंबिवली रेल्वे स्थानकाच्या दिशेने कामाला निघाले होते. त्यांना लहुजी नगर कोपऱ्यावरील रस्त्यावर दुचाकी वरुन येऊन दोन इसमांनी अडविले. त्यांना चाकुचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीची सोनसाखळी काढून धूम स्टाईलने पळून गेले होते. या गुन्ह्याचा खडकपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड तपास करत असताना लता साठे यांची सोनसाखळी चोरणारे दोन गुन्हेगार मोहने येथील लहुजी नगरमध्ये रात्री बारा वाजता येणार आहेत, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी सापळा लावला. ठरल्या वेळेत दोन गुन्हेगार या भागात घुटमळू लागले. साध्या वेशातील एका पोलिसाने एका गुन्हेगाराला हटकताच तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेताच, दुसरा साथी पळून जाऊ लागला. गस्तीवरील पोलिसांनी त्याला पकडले आहे.