मुंबईराज्यात आलेल्या परदेशी गुंतवणुकीवरून राजकीय रण सुरू आहे. वेदांता फॉक्स कॉन हा प्रकल्प अद्याप गेला नसल्याचा दावा सरकार करत असताना हा प्रकल्प परत आणून दाखवा असे आव्हान विरोधकांनी दिले आहे. मात्र या पार्श्वभूमीवर राज्यात प्रत्येक जिल्ह्यात छोटे- छोटे प्रकल्प उभारून अधिक रोजगार निर्मिती करण्याचा राज्य सरकारचा मानस असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ईटीव्हीशी बोलताना सांगितले आहे. या दृष्टीने कोकणात एक महत्त्वाचा प्रकल्प लवकरच कार्यान्वित करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून 25 ते 30 हजार लोकांना रोजगार मिळेल असा दावाही सामंत यांनी केला आहे.
मरीन पार्क आणि मँगो पार्कमहाराष्ट्राला 720 किलोमीटरचा सागर किनारा लाभला आहे. तर कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या समुद्रकिनाऱ्यावर अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य आणि मासेमारीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असा हा पट्टा आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक मासेमारी चे उत्पन्न घेतले जाते. हजारो टन मासळी या ठिकाणाहून निर्यातही केली जाते. मासेमारीच्या या उद्योगाला चालना देण्यासाठी तसेच अतिशय मोठ्या प्रमाणात वैविध्यपूर्ण मासळी या ठिकाणी मिळत असून ही चविष्ट मासळी आणि या मासळीच्या बायो वेस्टपासून वेगवेगळे पदार्थ तयार करता येऊ शकतात. या दृष्टीने अत्याधुनिक यंत्रणेने सूसज्ज असे मरीन पार्क उभे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या ठिकाणी माशांवर प्रक्रिया केली जाणार आहे. एका विशिष्ट तापमानाखाली हे मासे साठवले जाणार असल्याने हे मासे सुमारे वर्षभर टिकू शकतात. तसेच ते मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात करण्यासाठी या ठिकाणी जेटी उभारण्याचा विचार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.