मुंबई- कोरोनामुळे भारतीय रेल्वेकडून नियमित रेल्वे गाड्यांना नवीन क्रमांक देऊन विशेष भाड्यावर चालविण्यात येत आहे. त्यातच आता मध्य रेल्वे, दक्षिण रेल्वे, पश्चिम-मध्य रेल्वे आणि उत्तर-पश्चिम रेल्वे या चार झोनच्या कोकण मार्गाने धावणाऱ्या १८ रेल्वे गाड्या सुपरफास्ट नसतानासुद्धा प्रवाशांकडून सुपरफास्टचा शुल्क आकारत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेच्या चुकीचा धोरणामुळे दुहेरी फटका बसत आहे. त्यामुळे रेल्वेने याकडे लक्ष घालून तत्काळ प्रवाशांकडून सुपरफास्ट शुल्क घेणे थांबविण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
रेल्वे नियमाला बगल -
कोरोना महामारीच्या संकटात संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून बंद झालेल्या बहुतांश रेल्वे आता सुरू झाल्या आहेत. मात्र, नियमित गाड्याऐवजी मेल-एक्स्प्रेसच्या नंबरमध्ये बदल करून विशेष भाड्याने या गाड्या आज देशभरात धावत आहे. सर्वसामान्य नागरिकांचे लॉकडाऊनमुळे आगोदरच कंबरडे मोडले आहे. यात प्रत्येक बाबींचे दर प्रचंड वाढल्याने नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. सामान्य नागरिकांना परवडणारे रेल्वेचे तिकीटदेखील विशेष गाड्याचा नावावर वाढविण्यात आले आहे. त्यातच त्यात आता मध्यरेल्वे, दक्षिणरेल्वे, पश्चिम-मध्य रेल्वे आणि उत्तर-पश्चिम रेल्वे या चार झोनच्या कोकण मार्गाने धावणाऱ्या १८ रेल्वे गाड्या सुपरफास्ट नसतानासुद्धा प्रवाशांकडून सुपरफास्टचा शुल्क आकारत आहे. रेल्वेच्या नियमानुसार कोणतीही गाडी सुपरफास्ट होण्यासाठी तिच्या दोन्ही दिशांचा सरासरी वेग किमान ५५ किमी प्रतितास इतका असणे आवश्यक असते. परंतु, कोकण मार्गावरून जाणाऱ्या १८ रेल्वे गाड्या सुपरफास्ट नसतानाही रेल्वे प्रवाशांकडून सुपरफास्ट शुल्क आकारण्यात येत आहे, अशी माहिती रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. याबाबत आम्ही रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली असता रेल्वे प्रशासनाकडून या प्रश्नी माहिती घेऊन आपणास सांगितले जाईल, असे उत्तर देण्यात आले.
हेही वाचा -प्रताप सरनाईकांच्या पत्रावरून किरीट सोमैयांची बोचरी टीका, म्हणाले...
या आहे १८ रेल्वे गाड्या -
मध्यरेल्वेच्या ०११५१ जनशताब्दी एक्स्प्रेस, ०११५२ जनशताब्दी एक्स्प्रेस, ०२११९ तेजस एक्स्प्रेस, ०२१२० तेजस एक्स्प्रेस, ०११३३ मुंबई मंगळुरु विशेष, ०११३४ मंगळुरु मुंबई विशेष, दक्षिण रेल्वेच्या ०६०७१ दादर तिरुनेलवेली विशेष एक्स्प्रेस, ०६०७२ तिरुनेलवेली-दादर विशेष एक्स्प्रेस, ०२६१९ मत्स्यगंधा फेस्टिव्हल विशेष एक्स्प्रेस, ०२६२० मत्स्यगंधा फेस्टिव्हल विशेष एक्स्प्रेस, ०६१६३ गरीबरथ विशेष एक्स्प्रेस, ०६१६४ गरीबरथ विशेष एक्स्प्रेस, ०२६१७ मंगला विशेष एक्स्प्रेस, ०२६१८ मंगला विशेष एक्स्प्रेस, पश्चिम-मध्य रेल्वेच्या ०२१९७ कोयम्बटूर-जबलपूर विशेष एक्स्प्रेस, ०२१९८जबलपूर- कोयम्बटूर-विशेष एक्स्प्रेस आणि उत्तर पश्चिम रेल्वेच्या ०२७४५ हिसार-कोयंबटूर एसी विशेष एक्स्प्रेस, ०२७४६ कोयंबटूर- हिसार एसी विशेष एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे. या १८ रेल्वे गाड्या सुपरफास्ट नसताना सुद्धा प्रवाशांकडून सुपरफास्टचा शुल्क आकाराला जात आहे.
प्रवाशांची लूट थांबवा -
विशेष म्हणजे कोकण रेल्वे मार्गावर आगोदरच रेल्वे प्रवासी वाहतुकीसाठी ४० टक्के अधिभार घेतल्या जात आहे. हा अधिभार १९९५ पासून घेण्यात येत आहे. तसेच गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे सर्व नियमित गाड्या वेगळ्या क्रमांकाने विशेष गाड्या या नावाखाली ३० टक्के वाढीव भाड्यावर सुरु आहे. त्यातच आता १८ रेल्वे गाड्या सुपरफास्ट नसताना सुद्धा रेल्वे सुपरफास्ट शुल्क प्रवाशांकडून वसूल केली जात आहे. सुपरफास्ट गाडीसाठी असणारे रेल्वेचे निकष पूर्ण न करू शकणाऱ्या रेल्वे गाडयांना रेल्वेने सुपरफास्ट अधिभार लावू नयेत, तसेच पूर्वलक्षी प्रभावाने याआधी घेतलेला अधिभार संबंधित प्रवाशांना परत करावा. गाडी सुपरफास्टसाठीचे निकष पूर्ण करत नाही, तोपर्यंत तिला मेल-एक्सप्रेसच ठेवावे व त्यानुसार भाडे आकारणी करावी, अशी मागणी रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून रेल्वेला केली आहे.
रेल्वेचा काय आहे नियम -
रेल्वे नियमानुसार ज्या रेल्वे गाडीचा वेग ५५ किमी प्रतितास इतका असतो. त्या रेल्वे गाडीच्या प्रति प्रवाशांकडून सुपरफास्ट शुल्क आकारण्यात येते. एक्झिक्युटिव्ह एसी-१ कोच ७५ रुपये, एससी-२ कोच ४५ रुपये, एसी-३ ४५ रुपये, प्रथम श्रेणी ४५ रुपये, स्लिपर कोच ३० रुपये आणि व्दितीय श्रेणी १५ रुपये असा सुपरफास्ट शुल्क आकारण्यात येतो. मात्र, आज १८ गाड्यांच्या वेग ५५ किमी प्रतितास पेक्षा कमी आहे. तरी सुद्धा या गाड्यांचा प्रवाशांकडून चुकीचा सुपरफास्ट शुल्क आकारण्यात येत आहे.
हेही वाचा -काँग्रेस निवडणुका स्वबळावर लढवणार, आघाडी कायमस्वरुपी नाही - पटोले