मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लसीकरणासाठी यंत्रणा सज्ज आहे, मात्र लसीचा तुटवडा आहे. सरकारकडून लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी नोंदणीकरता कोविन अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. ज्यांची कोविन अॅपवर नोंदणी होत नाही अशा लाभार्थ्यांची नोंदणी लसीकरण केंद्रावर होते. यासाठी आधार कार्डची विचारणा केली जाते. मात्र, ज्यांच्याकडे कोणतीच कागदपत्रे नाहीत अशा लाभार्थ्यांचे काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
हेही वाचा -'प्रकाश जावडेकरांनी महाराष्ट्राची माफी मागावी'
आधार नसल्याने लसीकरण कसे होणार?
राज्यासह संपूर्ण देशात भटक्या विमुक्त समाजाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. सूर्य उगवला की मोकळ्या आकाशाच्या छताखाली रोजच्या दिवसाची सुरुवात करायची. दिवस माथ्यावर आला की झाडांची सावली पाहून निजायचे. आपल्या चिल्यापिल्यांना सोबत घेवून संसार करायचा. या परिस्थितीशी झगडताना कोरोनासारखे संकट येते. या संकटावर मात करण्यासाठी लसीकरणाला सुरुवात झाली आहे, मात्र लसीकरणाला आधार कार्डची गरज आहे. पण, आधार कार्ड नसल्याने लसीकरण कसे होईल? हा प्रश्न अशा समाजातील नागरिकांसमोर समोर उभा आहे.
रासपचे महादेव जानकर यांनी केली मागणी
राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांनी देखील या प्रसंगी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडे मागणी करत भटक्या समाजातील बहुसंख्य लोकांसाठी या अडचणीच्या काळात ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच, दुर्लक्षित घटकांचेही लसीकरण होणे गरजेचे असल्याचे महादेव जानकर म्हणाले.
भटक्या-विमुक्तांचेही लसीकरण व्हावे
या काळात कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. यामुळे रस्त्यावर चिटपाखरू नाही. रस्त्यावर कोणी दिसले तर पोलीस त्यांना घरी जाण्याच्या सूचना करत आहेत. मात्र, ज्यांचे घरचं फुटपाथ आहे, त्यांनी काय करावे? कुठे जावे आणि कुणाला सांगावे? आज ना उद्या कोरोना नष्ट होईल. पुन्हा थांबलेली शहरे धावायला लागतील. या शहरांच्या गतीत आपले भटके विमुक्त बांधव मागे राहू नये आणि यांचे लसीकरण लवकरात लवकर व्हावे ही अपेक्षा.