मुंबई - कुर्ला काजुपाडा येथील संगम सोसायटीमध्ये एका घरावर दरड कोसळली. यात घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने धाव घेऊन दोन जणांना सुखरूप बाहेर काढले आहे. पावसाळा सुरु होताच मुंबईमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना सुरु झाल्या आहेत. यामुळे यंदाच्या पावसातही दरडीखाली राहणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन राहावे लागणार आहे.
परंतु काहीही झाले नाही - कुर्ला साकीनाका काजुपाडा येथील संगम सोसायटीत राहणारे अशोक व्हटकर यांच्या घरावर डोंगराचा काही भाग भाग कोसळला. या दुर्घटनेबाबत बोलताना, मी एक अपंग आहे. दरड कोसळल्याने माझ्या घराचे नुकसान झाले आहे. मी घराच्या वरच्या मजल्यावर अडकलो होतो. अग्निशमन दलाने माझी सुटका केली. सकाळी मी कामावर जाण्यासाठी उठलो. बाहेर रिमझिम पाऊस पडत होता. घरात दोन मुलगे आणि पत्नी होते. माझे कुटुंब तळमजल्यावर होते त्यामुळे त्यांना त्रास झाला नाही. माझ्या घराची भिंत कोसळली आणि घराच्या इतर भिंतींनाही भेगा पडल्या. आम्ही येथील स्थानिक नगरसेवक हरीश भांदिर्गे यांना परिसर स्वच्छ करण्यासाठी पत्र दिले होते, परंतु काहीही झाले नाही. टेकडीवर काही झोपडपट्ट्या आहेत. त्यांच्या घरातील सांडपाणीही आमच्या घराजवळ येते. या घटनेनंतर आता सर्वजण आम्हाला सहानुभूती द्यायला येत आहेत, अशोक व्हटकर यांनी सांगितले.
पावसाळ्यात काय होईल -आम्ही स्थानिक अधिकारी आणि राजकीय पक्षाच्या नेत्यांना टेकडीच्या उतारावरील कचरा साफ करण्याची विनंती केली आहे परंतु कोणीही आमच्या विनंतीकडे लक्ष दिले नाही. चांदिवली विधानसभा क्षेत्राला एकच डंपर दिल्याचे आम्हाला सांगण्यात आले. आणि नगरसेवकांनी हा डंपर त्या भागात कुठे ठेवू असे सांगितले. आता ही घटना घडली आहे." ते पुढे म्हणाले, "टेकडीच्या आजूबाजूला जवळपास २० घरे आहेत. मान्सून अजून आलेला नाही. ही परिस्थिती केवळ पहिल्या रिमझिम पावसाची आहे. पावसाळ्यात काय होईल याची तुम्ही कल्पना करू शकता असे येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले.
स्थलांतर होण्यासाठी नोटीस - मुंबईत २५० भूस्खलन क्षेत्र आहेत. त्यातील १७६ क्षेत्रे पूर्व उपनगरात, शहर भागात ४२ आणि पश्चिम उपनगरात ३१ आहेत. पालिकेच्या आकडेवारीनुसार पूर्व उपनगरातील १७६ ठिकाणांपैकी ११६ भूस्खलन क्षेत्र भांडुप आणि विक्रोळी दरम्यान आहेत. तर घाटकोपर भागात ३२ भूस्खलन ठिकाणे येतात. पावसाळ्यापूर्वी दरवर्षी पालिका या कुटुंबांना इतरत्र स्थलांतरित होण्यासाठी नोटीस बजावते. यंदाही पालिकेने या घरांना नोटिस बजावल्या आहेत.
नागरिकांना प्रशिक्षण -दरडी कोसळणाऱ्या भागात पालिकेने यंदा एनडीआरएफच्या ३ टीम तैनात केल्या आहेत. ज्या थैकनी दरडी कोसळू शकतात अशा विभागातील १० हजार नागरिकांना बचाव काम व प्रथोमोपचार याचे प्रशिक्षण दिले जात आहे. असे प्रशिक्षण दिल्याने मचाण पथक पोहचे पर्यंत स्थानिक नागरिक दुर्घटनेत अडकलेल्या नागरिकांचा जीव वाचवण्याचे काम करू शकतील असे आप्ताकलीन व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांनी सांगितले.