मुंबई - सायन कोळीवाडा येथील एका बिल्डरला पालिका वृक्ष प्राधिकरणाने विकास कामांसाठी २२ झाडे कापण्यास परवानगी दिलेली असताना त्याने तेथील सर्वच म्हणजे ६९ झाडांची कत्तल केली आहे. या वृक्ष कत्तलीला अप्रत्यक्षपणे आयुक्त, वृक्ष प्राधिकरण समिती यांना जबाबदार ठरवत बिल्डरवर कडक कारवाईची मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली आहे. तसेच या प्रकरणी वृक्ष प्राधिकरण समितीत विरोध न करणाऱ्या काँग्रेस नगरसेविकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती रवी राजा यांनी दिली.
भर दिवसा कत्तल -
सायन कोळीवाडा परिसरातील सरदार नगर येथील एका गृहनिर्माण सोसायटीच्या तीन इमारती धोकादायक ठरल्यामुळे त्यांचा बिल्डरच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यात येणार आहे. मात्र सदर जागेवरील काही झाडे बांधकामाच्या आड येत असल्याने बिल्डरने तेथील ६९ झाडांपैकी २२ झाडे कापण्यासाठी, ३६ झाडे आहे तशी जागेवरच ठेवण्यासाठी आणि उर्वरित ११ पुनर्रोपित करण्यासाठी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी मागितली होती. पालिका वृक्ष प्राधिकरण समितीने ३ ते ४ महिन्यांपूर्वीच बिल्डरला झाडे तोडण्याची परवानगी दिली. मात्र बिल्डरने सर्व ६९ झाडांची भर दिवसा कत्तल करून टाकली, असा आरोप रवी राजा यांनी केला.