मुंबई -मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. कोरोनामुळे मुंबईत रोज २५ ते ३० रुग्णांचा मृत्यू होत आहे. त्यातच आता नव्याने आलेल्या म्यूकरमायकोसिस आजाराची भर पडली आहे. मुंबईत सध्या म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांची एकूण संख्या ५४९ वर गेली आहे. त्यापैकी ८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने ३५७ रुग्ण अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत. आतापर्यंत ५९ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. बहुतेक रुग्ण आणि मृत्यू हे मुंबईबाहेरील रुग्णांचे असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
एकूण ५४९ रुग्णांची नोंद -
म्यूकरमायकोसिस म्हणजेच बुरशी या आजाराचे रुग्ण तुरळक प्रमाणात आढळून येत होते. मुंबईमधील रुग्णालयात वर्षाला चार ते पाच रुग्ण आढळून येत होते. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून म्युकर मायकोसिसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात आतापर्यंत एकूण ५४९ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ३५७ रुग्ण सध्या रुग्णालयात उपचार घेता आहेत. त्यापैकी १११ रुग्ण मुंबईमधील तर २४६ रुग्ण मुंबई आणि राज्याबाहेरील आहेत.
मुंबईतील १७ जणांचा मृत्यू -
एका आठवड्यापूर्वी मुंबईमधील रुग्णालयात म्युकर मायकोससीसच्या २२५ रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी ५ टक्के रुग्ण मुंबईमधील रुग्ण होते. एका आठवड्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयातील म्युकर मायकोसिसच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत म्युकर मायकोसिसमुळे ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १७ मृत्यू हे मुंबईमधील आहेत तर ४२ मृत्यू हे मुंबई बाहेरील तसेच राजयाबाहेरील आहेत अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.