मुंबई -एसटी कर्मचारी ऐन दिवाळीत संपावर गेल्याने राज्य सरकारने आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. सणासुदीला एसटी प्रवाशांचे हाल होऊ नये, यासाठी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी आज रात्री बारा वाजेपर्यंत संप मागे घेऊन कामावर रुजू व्हावे. अन्यथा आपल्याला नाईलाजवस्त कर्मचार्यांवर कारवाई करावी लागेल, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.
एसटी संपाचा सामान्य प्रवाशांना फटका बसतो आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये तोडगा निघावा, यासाठी विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेऊन चर्चा केली. ऐन दिवाळीच्या मोक्यावर कर्मचाऱ्यांची दिवाळी कडू होऊ नये, यासाठी अद्याप कोणत्याही कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली नसल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.
हेही वाचा-एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात विद्यार्थी अडकले चंद्रपुरात; मनसे धावली मदतीसाठी
कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य
दिवाळीच्या मोक्यावर एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने संप पुकारला आहे. हा संप मागे घेण्यासाठी कृती समितीसोबत याआधीच सकारात्मक चर्चा झाली होती. कर्मचाऱ्यांची 28 टक्के महागाई भत्ता तसेच घरभाडे भत्ता वाढवून कर्मचाऱ्यांच्या दोन मागण्या पूर्ण करण्यात आल्या होत्या. राहिलेल्या एका मागणीबाबत दिवाळी झाल्यानंतर चर्चा करणार असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. मात्र, सकारात्मक चर्चा होऊनही काही कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाची अवास्तव मागणी केली. त्यामुळे सध्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे परिवहन मंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचा-एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन तापले; बसचालकाचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ नये-
आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ नये, अशी विनंती यावेळी प्रवीण दरेकर यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे. राज्य सरकारमध्ये एसटीचे विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी परिवहन मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून मार्ग काढावा अशी विनंती यावेळी प्रवीण दरेकर यांनी केली. प्रवीण दरेकर यांनी केलेल्या मागणीबाबत आपण मुख्यमंत्री तसेच आघाडी सरकारमधील मुख्यमंत्र्यांशी बोलून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन या बैठकीत अनिल परब यांनी दिले आहे.
हेही वाचा-ST Worker Strike : बेमुदत संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे परिवहन मंत्र्यांचे आवाहन