मुंबई - मनी लॉन्ड्रिंगप्रकरणीच्या आरोपावरून शिवसेना नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना आज ईडीनं चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले आहेत.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ईडीच्या सर्व प्रश्नांना आपण उत्तर दिल्याचे सांगितले. परब म्हणाले की, आज मला जे समन्स आले होते, त्या समन्सच्या अनुषंगाने मी ईडी कार्यालयात आलो होतो आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला जे प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहेत. ईडी ही एक ऑथोरिटी आहे आणि ऑथोरिटीला उत्तरे देणे ही माझी जबाबदारी आहे, असे अनिल परब यांनी म्हटले आहे.
अनिल परब यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर आज सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. हे त्यांना ईडीचे दुसरे समन्स होते. अनिल परब ईडीच्या कार्यालयात हजर होण्यासाठी आले असता त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती. ‘मी शिवसेनाप्रमुख आणि माझ्या मुलीची शपथ घेऊन सांगतो मी चुकीचं काही केलं नाही’ असे परब म्हणाले होते.
अनिल परब ईडी कार्यालयात जाताना हे ही वाचा -कोल्हापूर : सात दिवसात एफआयआर दाखल करा; अन्यथा न्यायालयात, किरीट सोमैयांचा इशारा
चौकशीला जाण्यापूर्वी काय म्हणाले होते अनिल परब?
आज सकाळी चौकशीसाठी ईडी कार्यालयात जात असताना अनिल परब म्हणाले होते की, मला आज ईडीचे दुसरे समन्स मिळालेले आहे आणि मी चौकशीला आज आहे. मी शिवसेनाप्रमुखांची आणि माझ्या मुलीची शपथ घेऊन आधीच सांगितले आहे की, मी कुठलंही चुकीचं काम केलेले नाहीये. त्यामुळे आज मी चौकशीसाठी सामोरं जात आहे. चौकशीत जे प्रश्न मला विचारले जातील त्याची उत्तरं दिली जातील आणि चौकशीत पूर्णपणे सहकार्य करणार आहे. ईडी ही एक तपास संस्था आहे. त्यामुळे या तपास संस्थेला उत्तर देण्यासाठी मी बांधील आहे. मात्र इतर वैयक्तिकरित्या प्रश्न विचारणाऱ्यांना उत्तर देण्यास मी बांधील नाही. ईडी अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला मी उत्तर दिले आणि माझ्या उत्तराने ईडी अधिकाऱ्यांचा समाधान झालं असेल, अशी आशा अनिल परब यांनी यावेळी व्यक्त केली.
हे ही वाचा -मुलींची शपथ घेऊन सांगतो, मी काहीही चुकीचं केलं नाही, ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार - अनिल परब
अनिल परब यांच्यावर काय आहे आरोप ?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सुरू असलेल्या मनी लाँड्रिग प्रकरणात चौकशी करण्यासाठी अनिल परब यांनाही ईडीने समन्स पाठवले आहे. मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात अनिल परब यांना 20 कोटी रूपये मिळाल्याचा आरोप निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने केला होता. त्यासंबंधी ईडीने अनिल परब यांची चौकशी केली.
परबांविरोधात 'ईडी'कडे तीन तक्रारी
'ईडी'कडे मंत्री परब यांच्याविरुद्ध सध्या तीन वेगवेगळ्या प्रकरणाच्या तक्रारी आहेत. त्यामध्ये मुंबई पोलिसांचे १०० कोटी वसुली प्रकरण व सचिन वाझेने एनआयए कोठडीतून त्यांच्याबद्दल केलेला उल्लेख, त्याचप्रमाणे परिवहन विभागातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अधिकाऱ्याने दिलेली तक्रार आणि दापोली येथील मालमत्ता व अवैध परवाने, बांधकामाबद्दल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिलेल्या तक्रारींचा समावेश आहे. 'ईडी'ने परबांना नोटीस बजावून ३१ ऑगस्टला ११ वाजता कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली होती. मात्र, परब पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे चौकशीला हजर राहू शकत नसल्याचे कळवत गैरहजर राहिले होते. त्यानंतर आज (२८ सप्टेंबर) परब यांनी ईडीच्या कार्यालयात हजर राहावे, असे 'ईडी'ने पाठवलेल्या समन्समध्ये नमूद केले होते. त्यानुसार परब आज 'ईडी'च्या चौकशीला सामोरे गेले.