मुंबई - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला तरी एसटी महामंडळाच्या बसेस अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावत आहेत. टाळेबंदीच्या काळात 'फ्रंट लाईन वर्कर' म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली असून अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अशा कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांची व त्यांच्या कुटुंबियांची काळजी घ्या आणि त्यांना तातडीने उपचार मिळवून द्या, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी सोमवारी कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष शेखर चन्ने यावेळी उपस्थित होते. यावेळी विविध विषयांवर देखील चर्चा झाली. राज्यात संचारबंदी असली तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहोचवण्याची जबाबदारी एसटीचे चालक-वाहक यशस्वीपणे पार पाडत आहे. ही जबाबदारी पार पाडत असताना एसटीच्या चालक-वाहकांबरोबरच महामंडळाच्या अनेक कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर विविध ठिकाणी उपचार सुरु आहेत. मात्र, त्याचबरोबर अनेक कर्मचाऱ्यांना मृत्यूनेही गाठले आहेत.