मुंबई - 'महाराष्ट्रातील अर्थकारण फक्त फडणवीसांना समजतं असं नाही. सरकारमध्ये बसलेले देखील अर्थकारण जाणतात', असा टोला मंत्री अनिल परब यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. तसेच राज्य सरकार उद्या केंद्राने दिलेल्या या आकडेवारीची पोलखोल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
'महाराष्ट्र सरकार फडणवीसांच्या आकडेवारीची पोलखोल करणार'
'महाराष्ट्रातील अर्थकारण फक्त फडणवीसांना समजतं असं नाही. सरकारमध्ये बसलेले देखील अर्थकारण जाणतात', असा टोला मंत्री अनिल परब यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. तसेच राज्य सरकार उद्या केंद्राने दिलेल्या या आकडेवारीची पोलखोल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 'फेसबुक लाइव्ह'वर संबोधन केले. यावेळी त्यांनी केंद्राने राज्य सरकारला दिलेल्या मदतीचा पाढा वाचून दाखवला. तसेच राज्याच्या गरजेहून जास्त मदत केंद्राने पोहोचवल्याचा दावा केला. यासंबंधी त्यांनी आकडेवारी दिली. याला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारने काय करायला पाहिजे, याबाबत मोठं मार्गदर्शन केल्याचं परब म्हणाले. फक्त तुम्हालाच सगळं कळतं असं नाही. राज्य सरकारमध्ये देखील जाणकार लोक आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
भाजपच्या सल्ल्याने सरकार चालले तरच ते चालू शकेल, असे फडणवीसांना वाटत असल्यास ते लोकांची दिशाभूल करत आहेत, असे परिवहन मंत्री म्हणाले. मात्र, राज्य सरकार सक्षमपणे काम करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकार भाजपच्या आकडेवारीची पोलखोल करणार असल्याचे परब यांनी सांगितले.