मुंबई:शिवसेना नेते संजय राऊतांची (Sanjay Raut) पत्नी वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांची पत्नी माधवी राऊत या दोघींमध्ये झालेल्या व्यवहारातील 1 कोटी 6 लाख रुपयांचा हिशोब लागत नाही आहे. ईडीचा याबाबत तपास सुरू आहे, अशी माहिती अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी कोर्टाला दिली आहे. ते ईडीच्या वतीने संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर युक्तिवाद करत आहेत. पत्राचाळ प्रकरणात (Patra Chawl Case) संजय राऊत हे पडद्यामागून सर्व सूत्र हाताळायचे, असे देखील ईडीने आज म्हटले आहे.
ईडीने नोंदवलेल्या गुन्ह्यानुसार ४ प्रकारात जामीन अर्जाची विभागणी करण्यात आली आहे, असा युक्तीवाद ईडीकडून अनिल सिंह यांनी कोर्टासमोर मांडला. म्हाडा आणि इतर प्रशासकीय बैठकांसाठी संजय राऊत यांनी राजकीय हेतूने मदत केल्याचेही तपासात समोर आलेले आहे. पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प सुरूवातीला 13 एकरात होणार होता. मात्र कालांतराने 47 एकरात या प्रकल्पाचा विस्तार करण्याचे ठरवले. या प्रकल्पात 672 रहिवाशी होते. या प्रकल्पातील 18 इमारतींपैकी 16 इमारतींच काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली, मात्र पडताळली केल्यावर लक्षात आले की या प्रकरणातील अद्याप एकही इमारत तयार झालेली नाही.
जागा म्हाडाची: पत्राचाळ प्रकल्प ज्या ठिकाणी बनत आहे ती जागा म्हाडाची आहे. म्हाडाने गुरू आशिषला हे काम दिलं होतं. मात्र काम देताना रहिवाशांच पुर्नवसन करण्यासही सांगितलं होतं. ते पुनर्वसन त्याच जागेत करण्यात यावे असेही त्यावेळी सांगण्यात आले होते. प्रकल्प सुरू केल्यानंतर पहिल्यांदा तेथील स्थानिक रहिवाशांचं पुर्नवसन करावे असे ठरले होते, मात्र दुर्दैवाने ते अजून झालेले नाही. स्थानिक रहिवासी अद्यापही घराच्या प्रतीक्षेत आहे. गुरू आशिषने स्वत:च्या फायद्यासाठी खासगी विकासकांना प्रकल्प विकला आणि लोण स्वरुपात घेतलेल्या पैशांचा गैरवापर केल्याचा युक्तिवाद ईडीचे वतीने वकिल अनिल सिंह यांनी केला आहे. गुरू आशिष कंपनीत प्रवीण राऊत याच्यासोबतचे त्याचे आर्थिक व्यवहार हेही समोर आले आहे, असे देखील अनिल सिंग यांनी म्हटले आहे.
पत्रा चाळ प्रकरण नेमकं काय? :पत्राचाळ किंवा सिद्धार्थ नगर हे मुंबईतल्या गोरेगाव भागात आहे. पत्रा चाळीतल्या 672 भाडेकरूंना नवीन घर बांधून द्यायचं आणि उरलेली जागा खासगी विकासकांना विकायची, असा करार गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडने म्हाडासोबत 2007 साली केला होता. जीएपीसीएल, म्हाडा आणि भाडेकरू या तिघांमध्ये हा करार झाला होता. पण 14 वर्षांनंतरही हा करार फक्त कागदावरच राहिला. पत्रा चाळचे रहिवासी अजूनही घर मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. इडीच्या दाव्यानुसार प्रविण राऊत आणि जीएपीसीएलच्या इतर डायरेक्टर्सनी भाडेकरूंसाठी एकही घर उभारलं नाही, उलट त्यांनी जागा 9 खासगी विकासकांना 901.79 कोटी रुपयांना विकली. याशिवाय जीएपीसीएलने 'द मिडोस' या नावाने नवीन प्रोजेक्ट लॉन्च केलं आणि फ्लॅट विकत घेणाऱ्यांकडून 138 कोटी रुपये बुकिंगची रक्कम स्वीकारली, असा आरोपही ईडीने केला आहे.
जीएपीसीएलकडून भाडं भरलं जात नसल्याची तसंच प्रोजेक्टला उशीर होत असल्याची तक्रार भाडेकरूंकडून करण्यात येऊ लागली, त्यानंतर हे प्रकरण समोर आलं. जीएपीसीएल प्रोजेक्ट पूर्ण होईपर्यंत पत्रा चाळीच्या भाडेकरूंचं भाडं भरेल, असं करारात नमूद करण्यात आलं होतं, पण जीएपीसीएलने 2014-15 पर्यंतच भाडं भरलं. याच काळात जीएपीसीएलने भाडेकरूंसाठी एकही घर न उभारता 9 खासगी विकासकांना एफएसआय विकला. जानेवारी 2018 साली म्हाडाने भाडं न भरल्यामुळे आणि इतर अनियमिततांचं कारण देत जीएपीसीएलला टर्मिनेशनची नोटीस पाठवली, पण तेव्हाच जीएपीसीएलकडून एफएसआय विकत घेतलेल्या 9 खासगी विकासकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली, ज्यामुळे प्रोजेक्ट ठप्प झालं.
बांधकाम पुन्हा सुरु: 2020 साली महाराष्ट्र सरकारने निवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय कमिटी स्थापन केली. ही कमिटी पत्रा चाळीच्या भाडेकरूंचं पुनर्वसन कसं करायचं आणि घराची भाडी कशी द्यायची, याबाबत सल्ला देणार होती. जून 2021 साली राज्य मंत्रिमंडळाने पुन्हा एकदा पत्रा चाळीच्या पुनर्विकासाला मान्यता दिली आणि जुलै 2021 साली सरकारने याबाबतचा ठराव मांडला. फेब्रुवारी 2022 साली तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पत्रा चाळीचं ठप्प पडलेलं बांधकाम पुन्हा एकदा सुरू झालं.
ईडीची केस काय? :ईडीने केलेल्या दाव्यानुसार, जीएपीसीएलच्या बेकायदेशीर कारवाईमधून 1,039.79 कोटी रुपयांचा घोटाळा झाला. प्रविण राऊत यांना एचडीआयएलकडून 100 कोटी रुपये मिळाले. हे पैसे नंतर वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये वळवण्यात आले. ही खाती प्रविण राऊत यांच्या कुटुंबातील सदस्य आणि व्यावसायिकांची आहेत. यात संजय राऊत यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे, असं ईडीने सांगितलं. 2010 साली संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांच्या खात्यात प्रविण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी 83 लाख रुपये जमा केले.
वर्षा यांनी ह्या रक्कमेचा वापर दादरमध्ये घर विकत घेण्यासाठी केला, असा दावा इडीने केला आहे. इडीची चौकशी सुरू झाल्यानंतर वर्षा राऊत यांनी माधुरी यांना 55 लाख रुपये ट्रान्सफर केले. याच काळात अलिबागमध्ये किहीम बिचजवळ वर्षा राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्या नावाने 8 प्लॉट विकत घेण्यात आले. स्वप्ना पाटकर ह्या सुजित पाटकर यांच्या पत्नी आहेत. सुजित पाटकर हे संजय राऊतांच्या जवळचे आहेत. जमिनीच्या या व्यवहारामध्ये नोंदणीकृत किंमतीशिवाय जमिन विकणाऱ्याला रोख रक्कमही देण्यात आली. ही संपत्ती आणि प्रविण राऊत यांच्या इतर संपत्तीची माहिती घेतल्यानंतर प्रविण राऊत आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींची संपत्ती जप्त करण्यात आली, अशी माहिती इडीने दिली आहे. दोन समन्सनंतर संजय राऊत चौकशीसाठी हजर राहिले नाहीत, त्यानंतर इडीने संजय राऊत यांच्या घरावर धाड टाकली. दिवसभर चौकशी केल्यानंतर संजय राऊत यांना ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. इडीने याआधी राऊतांची दादर आणि अलिबागमधली संपत्ती जप्त केली.