मुंबई -तौक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह गुजरातला जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. आता पुन्हा भारताच्या पूर्व किनारपट्टीवर 'यास' नावाचे नवे चक्रीवादळ धडकणार आहे. यामुळे भारतीय रेल्वेकडून खबरदारी म्हणून ओडिशाला जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तीन रेल्वे गाड्या रद्द
महाराष्ट्रासह गुजरातमध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. यातून यंत्रणा सावरत नाही तोच आता भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नवीन चक्रीवादळ धडकणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक वेगाने वाढला, तर येत्या २६ मे रोजी ‘यास’ चक्रीवादळ भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्या दृष्टीने सर्व विभागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारी म्हणून अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या ट्रेन क्रमांक 01019 सीएसएमटी - भुवनेश्वर विशेष एक्स्प्रेस, ट्रेन क्रमांक 01020 भुवनेश्वर - सीएसएमटी आणि 02145 लोकमान्य टिळक टर्मिनस - पुरी विशेष एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. या गाड्या 23 मे ते 25 मे 2021 दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा -दिलासा.. राज्यात ऑक्सिजनची मागणी घटली.. कोरोनाची दुसरी लाट ओसरणीला !