महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पर्यटन विकासातून होईल रोजगारनिर्मिती, अर्थव्यवस्थेला मिळेल चालना - मुख्यमंत्री - पर्यटन विकास लेटेस्ट बातमी

पर्यटन विकासासाठी पर्यटन विभाग घेत असलेले निर्णय कौतुकास्पद आहेत. आपल्याकडचे पर्यटन वैभव जगासमोर नेणे आणि त्यात नवनवीन पर्यटनस्थळांची, नवनवीन बाबींची भर टाकणे गरजेचे आहे. पर्यटन विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे जगभरातील पर्यटक राज्यात आल्यानंतर पर्यटन विकासातून रोजगार निर्मिती होईल असा आशावाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Cm Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By

Published : Aug 18, 2021, 12:05 PM IST

मुंबई - आपल्या राज्याला विविध पर्यटन वैभव लाभले आहे. हे वैभव जगभर पोहोचवण्यासाठी पर्यटन विभागाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामुळे जगभरातील पर्यटक राज्यात आल्यानंतर पर्यटन विकासातून रोजगार निर्मिती होईल. त्यातून अर्थविकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ते पर्यटन विभागाच्या विविध उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी वर्षा निवासस्थानी बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, आदींची उपस्थिती होती. तर परिवहन मंत्री अॅड. अनिल परब, खासदार विनायक राऊत यांच्यासह पुणे आणि रत्नागिरीचे जिल्हाधिकारी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

एमटीडीसीचे नवीन संकेतस्थळ सुरू

एमटीडीसीने जलद आणि अधिक कार्यक्षम सेवा देण्यासाठी पर्यटनस्थळांच्या तपशीलवार माहितीसह नवीन संकेतस्थळ सुरु केले आहे. तसेच सिंहगड येथील एमटीडीसीच्या पर्यटक निवासाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. गणपतीपुळे येथे बोट क्लब सुरु करण्यात येत असून या तिन्ही उपक्रमांचा मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते यावेळी शुभारंभ करण्यात आला.

विविध संस्थांसमवेत एमटीडीसीने केला सामंजस्य करार . . .

एमटीडीसीच्या पर्यटक निवासांचे बुकींग अधिक सुलभ होण्यासाठी मेक माय ट्रीप आणि गो आय बीबो या नामांकित संकेतस्थळांबरोबर सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे एमटीडीसीची पर्यटक संकुले आता ही संकेतस्थळे वापरुन कोठुनही बूक करता येणार आहेत. महाराष्ट्रात स्काय डायव्हींग साहसी क्रीडा प्रकार सुरु करण्याच्या दृष्टीने स्काय-हाय सोबत सामंजस्य करार करण्यात आला. तसेच एमटीडीसी कर्मचाऱ्यांसाठी वार्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्यासोबतही सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील आणि संबंधीत संस्थेच्या प्रतिनिधींनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

राज्यात पर्यटनाच्या असंख्य संधी . . .

कोरोनामुळे सध्या पर्यटनावर बंधने आहेत. मात्र विविध धोरणे ठरवून पर्यटनस्थळाच्या पायाभूत सुविधामध्ये वाढ करण्याबरोबर पर्यटन विकासासाठी पर्यटन विभाग घेत असलेले निर्णय कौतुकास्पद आहेत. आपल्याकडचे पर्यटन वैभव जगासमोर नेणे आणि त्यात नवनवीन पर्यटनस्थळांची, नवनवीन बाबींची भर टाकणे गरजेचे आहे. मुंबई हे पर्यटन वैविध्याने नटलेले शहर आहे. येथे समुद्रकिनारा आहे, वन्यजीवन आहे, प्राचीन मंदिरे-गुंफा आणि किल्ले आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारखे जंगल तर फ्लेमिंगो अभयारण्य देखील आहे. या सर्वांच्या सोबतीला आधुनिकतेची जोड आहे. आता मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय सुरु करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. आपले राज्यही अशाच पद्धतीने पर्यटन वैविध्याने नटले आहे. पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात गेल्यानंतर आपण फक्त विठोबाचे दर्शन घेतो. पण हे मंदीर सुद्धा पाहण्यासारखे असून तिथल्या खांबांवर नक्षीकाम आहे, विविध पौराणिक प्रसंग त्यावर कोरण्यात आले आहेत. लोणार परिसरातील मंदीरेही अशाच पद्धतीने ऐतिहासिक आणि अप्रतिम आहेत असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

पर्यटन स्थळांवर उत्तम दर्जाच्या सेवा सुविधा असाव्यात

एमटीडीसीने त्यांच्या पर्यटक निवासांच्या नुतनीकरणासाठी घेतलेल्या पुढाकाराचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. जगभरातील कोणताही पर्यटक जेव्हा बुकींग करेल, तेव्हा त्याने एमटीडीसीच्या पर्यटक निवासाला प्राधान्य द्यायला हवे, अशा पद्धतीने चांगल्या दर्जाच्या सेवा-सुविधांची तिथे उपलब्धता करा. स्काय-हायसोबत करण्यात आलेल्या सामंजस्य करारामुळे राज्यातील साहसी पर्यटनाला चालना मिळणार आहे. अशा सर्व माध्यमातून राज्यातील पर्यटन वैभव जगभरासमोर खुले करण्यासाठी यापुढील काळातही पर्यटन विभागाला सर्वतोपरी प्रोत्साहन देण्यात यईल, असेही त्यांनी सांगितले.

पर्यटन विकासावर सरकारचे विशेष लक्ष - उपमुख्यमंत्री

राज्याच्या पर्यटनविकासाला सरकार मोठी चालना देणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे तर महाराष्ट्र राज्य स्थापनेला 60 वर्षे झाली असली, तरी देशाचा आणि महाराष्ट्राचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. हा गौरवशाली इतिहास समृद्ध आहे. हा इतिहास योग्य पद्धतीने लोकांपर्यत गेला पाहिजे. त्यासाठी पर्यटनवाढीला चालना देण्याची गरज आहे. राज्याच्या पर्यटनवाढीसाठी आपण अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. पर्यटन विभागाला अधिकचा निधी देण्याची सरकारची तयारी आहे.

पर्यटकांच्या माध्यमातून देशाचा इतिहास जगभरात पोचतो. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतो. अर्थव्यस्थेला चालना मिळते. जगभरात अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. पर्यटनक्षेत्र सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र आहे, त्यामुळे राज्यातील पर्यटन विकासावर राज्य शासनाचे विशेष लक्ष आहे. त्याचाच एक भाग म्हणून पर्यटन दिनाचे औचित्य साधून राज्यातील आदरातिथ्य क्षेत्रातील घटकांबरोबर २ हजार ९०५ कोटी रुपयांचा सामंजस्य करार आपण केला. या सामंजस्य करारामुळे राज्यातील पर्यटनक्षेत्राला चालना मिळणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रासारखी पर्यटन समृद्धी कुठेच नाही - आदित्य ठाकरे

पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध निर्णय सरकारने घेतली आहेत. महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या पर्यटनाच्या संधी आहेत. यासारखी पर्यटन समृद्धी अन्यत्र कुठे आढळून येत नाही. कृषी पर्यटन धोरण, बीच शॅक धोरण, कॅराव्हॅन पर्यटन धोरण, साहसी पर्यटन धोरण मंजुर करण्यात आले आहे. आदरातिथ्य क्षेत्राला चालना देण्यासाठी याला उद्योगाचा दर्जा देण्याबरोबरच यासाठी परवान्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात हॉटेल सुरु करण्यासाठी आता अनेकांकडून विचारणा होत आहे. राजशिष्टाचार विभागामार्फत नुकतीच मुंबईतील विविध देशांचे महावाणिज्य दूतांसमवेत बैठक संपन्न झाली, त्यांनीही महाराष्ट्राचा पर्यटनवारसा समृद्ध असल्याचे सांगितले. आता करण्यात आलेल्या विविध सामंजस्य करारातून या क्षेत्राला अधिक व्यापक करण्यासाठी पर्यटन विभागाने पुढाकार घेतल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details