मुंबई - मुंबईला जोरदार तडाखा देणाऱया तौक्ते चक्रीवादळाचा प्रभाव आता ओसरल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या वादळाचा शहर व उपनगराचा जोरदार फटका बसला. ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. शहर आणि उपनगरांत तब्बल २३६४ झाडे उन्मळून पडली. यात एका महिलेचा मृत्यू झाला. तर बोटींच्याअपघातात दोन जण अद्याप बेपत्ता आहेत. मागील २४ तासांत कमाल २३० मिमी पावसाची नोंद झाली. आजवर मुंबईत मे महिन्यात झालेल्या पावसाच्या तुलनेत हा पाऊस रेकॉर्ड ब्रेक ठरला आहे. राज्यात तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यात ४, रत्नागिरीत २, ठाण्यात २, सिंधुदुर्ग 2 तर मुंबई आणि धुळे जिल्ह्यात प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली आहे
वादळाचा तडाखा -
मुंबईत २४ तासांत सांताक्रुझ येथे २३०. ०३ मिमी तर कुलाबा येथे २०७.६ मिमी पावसाची नोंद हवामान विभागाने नोंदवली आहे. तर वाऱयाचा ताशी ११४ किमी वेग होता. या वादळासह पावसाने रुद्रावतार धारण करीत दिलेल्या जोरदार तडाख्याने मुंबईकरांना अक्षरक्षः धडकी भरली. मंगळवारीही जोरदार पाऊस कोसळेल, असा हवामान विभागाने इशारा दिला होता. मात्र पश्चिम उपनगरांत सकाळी काही वेळ सरी कोसळल्या त्यानंतर काहीशी वाऱयाची झुळूक वगळता पावसाचा जोर ओसरला. चक्रीवादळाचा प्रभाव ओसरल्याने मुंबईकरांना हायसे वाटले. सोमवारी झालेल्या चक्रीवादळामुळे मुंबईत झाडे पडली. भिंतीचे भाग कोसळले. घरांचे पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या. तसेच सखल भागात पाणी साचले होते.
एकूण २३६४ झाडे कोसळली -
चक्रीवादळामुळे मुंबईत सोमवारी सकाळपासून ते मंगळवारी सकाळपर्यंत एकूण २३६४ झाडे व त्यांच्या फांद्या कोसळल्या. यात शहरात ६६६, पूर्व उपनगरांत ५९५ तर पश्चिम उपनगरांत ११०३ असे एकूण २३६४ झाडे पडल्याची नोंद झाली. यात वरळी बीडीडी चाळ येथे वडाचे झाड अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.
४३ ठिकाणी घराच्य़ा भिंती कोसळल्या -
वादळामुळे सोमवारी पडलेल्या पावसामुळे आणि सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरात १८ ठिकाणी, पूर्व उपनगरांत १८ तर पश्चिम उपनगरांत ७ असे एकूण ४३ ठिकाणी घरे व घराच्या भिंती कोसळल्या. या घटनांत ९ जण जखमी झाले.
हेही वाचा -तौक्ते चक्रीवादळाचा विद्यार्थ्यांना फटका; ऑनलाईन परीक्षापासून अनेक विद्यार्थ्यां वंचित
बोट अपघातात दोनजण बेपत्ता -
तौत्के चक्रीवादळामुळे मढ जेट्टी येथे अँकर लावलेली बोट फुटून त्यात पाच व्यक्ती अडकली होती. यातील दोन जण बेपत्ता आहेत. मिळालेल्या माहितीनुसार माहिम कॉजवेच्या मागे, रेती बंदर येथील बोटीचा अँकर तुटून बोट समुद्रात गेली. या बोटीमध्ये पाच व्यक्ती होते. दोन व्यक्ती अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जातो आहे.