मुंबई: वाचा देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्या येथे (Important Top News).
महाराष्ट्रात मान्सून माघारीला पोषक वातावरण:महाराष्ट्रालाहवामान खात्याकडून दिलासादायक बातमी मिळाली आहे. राज्यात मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशाचा काही भाग आणि संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये मान्सून परतीस पोषक वातावरण निर्माण झाले असून, पुढच्या 24 तासांत मान्सून माघारी परतणार असल्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
आजपासून भरता येणार दहावी परीक्षेचे अर्ज, 10 नोव्हेंबरपर्यंत आहे मुदत: मार्च 2023 मध्ये घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य दहावी बोर्डाच्या परीक्षांसाठीचे अर्ज आजपासून भरता येणार आहेत. अर्ज भरण्याची मुदत ही 10 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. पुर्नपरिक्षा देणारे विद्यार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र मिळालेले खासगी विद्यार्थी यांनादेखील लवकरच अर्ज भरता येतील. या विद्यार्थ्यांसाठी अर्ज भरण्याची मुदत ही 11 ते 25 नोव्हेंबर दरम्यान असणार आहे.
पंतप्रधान मोदी यंदाही सैनिकांसह दिवाळी साजरी करणार: दरवर्षीप्रमाणे यंदाही सैनिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या सैनिकांसह दिवाळीचा सण साजरा करणार आहेत. मोदींचे दिवाळी दौऱ्याचे वेळापत्रक तयार झाले आहे. आपल्या दिवाळी दौऱ्यात ते तीन राज्यांना भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी या दौऱ्यात गुजरात, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशला भेट देणार आहेत. सर्वप्रथम 19-20 ऑक्टोबर रोजी पीएम मोदी गुजरात दौऱ्यावर असणार आहेत.
दिवाळीत महामंडळ दररोज 5 अतिरिक्त बसेस सोडणार: अमरावती आणि विदर्भातील अनेक लोकं सणांच्या वेळी पुण्याहून घरी येतात. अशावेळी प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळांकडून सेवा उपलब्ध करुन दिली जाते. यंदा पुण्यातून अमरावती येण्यासाठी १९ ऑक्टोबर तर अमरावतीतून पुण्यात जाण्यासाठी २७ ऑक्टोबरपासून महामंडळ दररोज पाच अतिरिक्त बस सोडणार आहे. प्रवाशांची संख्या वाढली तर अतिरिक्त बसची संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे.
मुंबईत 18 व 19 ऑक्टोबरला पाणीपुरवठ्यात 10 टक्क्यांची कपात: पिसे बंधाऱ्याच्या परिरक्षणाच्या कामामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठयात काही प्रमाणात कपात केली जाणार आहे. मुंबईत 18 व 19 ऑक्टोबरला पाणीपुरवठ्यात 10 टक्क्यांची कपात होणार आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने क्षेत्रातील नागरीकांना पाणी जपून व काळजीपूर्वक वापरण्याचे आवाहन केले आहे.