महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MAHARSHTRA BREAKING LIVE : मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला मेल - महाराष्ट्र पाऊस

मालाडमध्ये प्लास्टिक गोदामाला आग
मालाडमध्ये प्लास्टिक गोदामाला आग

By

Published : Jun 21, 2021, 6:43 AM IST

Updated : Jun 21, 2021, 10:44 PM IST

22:37 June 21

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला मेल

मुंबई - मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनला निनावी मेल आला आहे. पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा तपास सुरू आहे. मंत्रालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

22:16 June 21

पोस्ट मास्तरची पोस्ट ऑफिसमध्येच आत्महत्या; वणी येथील घटना

यवतमाळ -वणी तालुक्यातील शिंदोला माईन्स येथील पोस्ट कार्यालयात पोस्ट मास्टर पदावर कार्यरत असलेल्या 45 वर्षीय इसमाने वणी येथील पोस्ट ऑफिसमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 4 वाजताचे सुमारास घडली. ओमकार उर्फ बबन काशिनाथ पाचभाई असे आत्महत्या केलेल्या पोस्टमास्टरचे नाव असून तो वणी येथील विठ्ठलवाडी परिसरातील रहिवाशी आहे. 

19:26 June 21

उद्योजक अविनाश भोसले यांची ४० कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

पुणे - पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ईडी कडून गेल्या काही महिन्यांपासून अविनाश भोसलेंची चौकशी सुरू होती आणि मनी लॉड्रींग प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला होता. ईडीने अविनाश भोसलेंच्या पुणे आणि मुंबईतील मालमत्तांवरही छापे टाकले होते. राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांचे अविनाश भोसले हे सासरे आहेत.

19:03 June 21

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा दरवाढ

नवी दिल्ली - सोन्याचे दर दिल्लीत प्रति तोळा २५० रुपयांनी वाढून ४६,२७७ रुपये आहेत. जागतिक बाजारात सोन्याचे वाढलेले दर आणि रुपयाची डॉलरच्या तुलनेत घसरण या कारणांनी सोन्याचे दर वाढले आहेत.

मागील आठवड्यात सोन्याचा दर प्रति तोळा ४६,०२७ रुपये होता. दिल्लीत सोन्याचा दर प्रति तोळा ४६,२७७ रुपये आहे. सोन्यापाठोपाठ चांदीचे दर प्रति किलो २५८ रुपयांनी वाढून ६६,८४२ रुपये आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ६६,०२७ रुपये होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढून प्रति औंस १,७८२ डॉलर आहेत. चांदीचे दर अंशत: वधारून प्रति औंस २६.०५ डॉलर आहेत. गेल्या १५ महिन्यात सोन्याचे दर सर्वाधिक कमी झाल्यानंतर चांदीचे दर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे.

16:20 June 21

राज्याच्या गृहमंत्र्याला एपीआय दर्जाच्या अधिका-याशी संपर्क ठेवण्याचे कारणच काय? - सीबीआय

मुंबई -रश्मी शुक्ला यांनी सादर केलेला फोन टॅपिंगबाबतचा अहवाल लिक कसा झाला? तो का केला गेला?, याची राज्य सरकार चौकशी करतंय मात्र त्यातून काय माहिती समोर आली, काय डेटा सापडला?, याबाबत चौकशी न करताच ती फाईल बंद करण्यात आल्याचा दावा सीबीआयने मुंबई हायकोर्टात केला.

सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेणे, अन्य पोलीस अधिका-यांच्या बदल्या, परमबीर यांचे आरोप  हे सर्व एकमेकांशी संबंधित आहे. त्यामुळे राज्याच्या गृहखात्याशी संबंधित या प्रकरणाची कागदपत्रे या तपासाचाच एक भाग आहेत. असे सीबीआयने म्हटले आहे.  

राज्याच्या गृहमंत्र्याला एपीआय दर्जाच्या अधिका-याशी थेट संपर्क ठेवण्याचे कारणच काय? याचा तपास होणे आवश्यक असल्याचे देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी हायकोर्टात सांगितले. तक्रारदारही आरोपी निघाला असे ब-याचदा झालंय, परमबीर सिंग यांनी पत्राद्वारे तक्रार केलीय म्हणून त्यांचा तपास होणार नाही, असं नाही. सचिन वाझेंना सेवेत पुन्हा घेणाऱ्या समितीत परमबीर देखील होते. मात्र याची कागदपत्रेच मिळाली नाहीत तर सीबीआय तपास कसा करणार? असा सवाल केंद्र सरकारने उच्च न्यायालयात उपस्थित केला.

16:09 June 21

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी २४ जूनला बोलाविली बैठक

नवी दिल्ली- काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख व राज्य प्रभारींची २४ जूनला सकाळी साडेदहा वाजता बैठक बोलाविली आहे. ही बैठक ऑनलाईन होणार आहे. यामध्ये कोरोना, पेट्रोल-डिझेलचे दर, अर्थव्यवस्था आदी मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. प्रदेश काँग्रेस कमिटी प्रमुखांच्या बैठकीत सरकारविरोधात आंदोलन करण्याकरिता नियोजनावर चर्चा केली जाणार आहे.

16:06 June 21

मुख्यमंत्र्यांनी राजधर्माचे पालन करावे, मंत्री यशोमती ठाकूर

यशोमती ठाकूर यांनी केलेले ट्विट

अमरावती - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मराठा आरक्षण प्रकरणी चर्चा केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तब्बल तीस मिनिटे गुप्त भेट देखील घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा भाजप-शिवसेना एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच. तिकडे काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने महाविकास आघाडीमध्ये सर्वच काही सुरळीत नसल्याचे समोर आले. त्यात शिवसेनेच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची भाषा करणाऱ्यांना लोक जोडे मारतील, अशी बोचरी टीका नाव न घेता काँग्रेसवर केली होती. त्यानंतर आज काँगेसच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी एक ट्विट करून मुख्यमंत्र्यांनी राजधर्माचे पालन करावे, असं म्हटलं आहे.  

एक चीफ मिनिस्टर के लिए एक ही संदेश है की, वे राजधर्म का पालन करे, राजधर्म; अटलबिहारी वाजपेंयींच हे जगप्रसिद्ध वाक्य आज सहज वाचण्यात आलं, असे ट्विट ठाकूर य़ांनी केले आहे. 

15:39 June 21

शरद पवारांची उद्या नवी दिल्लीत १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक

नवी दिल्ली - उद्या (मंगळवार) दुपारी ४ वाजता १५ राजकीय पक्षांच्या नेत्यांसोबत शरद पवार बैठक घेणार आहेत. यात सध्याची राजकीय आणि आर्थिक स्थितीवर सर्वांगिण चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. या बैठकीला मनिष तिवारी आणि शत्रुघ्न सिन्हा उपस्थित राहण्याची शक्यता नाही. खासगी कामामुळे बैठकीला उपस्थित राहता येणार नाही, असे त्यांनी कळविल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 15 पक्षांचे नेते राष्ट्रमंचाच्या झेंड्याखाली एकत्र येणार असून शरद पवार यांचे निवासस्थान बैठकीचे केंद्रबिंदू आहे.

15:33 June 21

आजी सोबत शेतावर गेलेल्या 9 वर्षीय चिमुकलीचा वीज पडून मृत्यू

गोंदिया - आजी सोबत शेतकामासाठी शेतात गेलेल्या 9 वर्षीय चिमुकलीचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील रामाटोला/काचेवानी येथे घडली आहे. सोनू जयराम शहारे (वय 9 वर्ष) असे मृत पावलेल्या चिमुकलीचे नाव आहे. मृत सोनू ही आपल्या आजी सोबत जनावरे चारण्यासाठी शेताकडे गेली होती.  शेतात आजीला मदत करण्यासाठी गेली असता अचानक विजेच्या कडकड़ाटासह पावसाला सुरुवात झाली व वीज अंगावर पडल्याने सोनू गंभीररित्या भाजली.उपचारा दरम्यान तिचा मृत्यी झाला.

15:32 June 21

अर्नाळा येथे पिकनिकसाठी आलेला दहा वर्षाचा मूलगा समूद्रात बुडाला

पालघर /विरार  - रविवारी २० जून रोजी अर्नाळा येथे पिकनिकसाठी आलेल्या मोर्या कूटूंबातील दहा वर्षाचा मुलगा समूद्राच्या लाटांच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना संध्याकाळी घडली आहे. घटनास्थळापासून दीड किमी अंतरावर मुलाचा मृतदेह मिळाला असून अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नायगाव स्टारसिटी येथून मोर्या कूटूंबीय रविवारी अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यासमोरील सुरूची बागेत पिकनिकसाठी आले होते. यावेळी दहा वर्षाचा रिषू नितीन मोर्या हा मूलगा कूटूंबातील सदस्यांची नजर चुकवून समुद्रातील पाण्यात उतरला. यावेळी समूद्राच्या लाटांनी त्याला आतमध्ये ओढल्यानंतर तो बूडाला. 

14:56 June 21

मुंबई उच्च न्यायालयाकडून पत्रकार आणि कार्यकर्त्या राणा अयुब यांना दिलासा

मुंबई - गाझियाबाद वृध्द मारहाण प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आरोपी पत्रकार राणा अयुब यांनी ट्रांजिट जामीन अर्जासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाकडून 4 आठवड्यांसाठी 25 हजाराच्या बाँडवर जामीन ट्रान्झिट मंजूर करण्यात आला आहे. 

14:55 June 21

मनसुख हिरेन प्रकरण : आरोपी आनंद व संतोष शेलार यांना २५ जूनपर्यंत एनआयए कोठडी

 मुंबई - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात आरोपी आनंद आणि संतोष शेलार यांना मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाकडून 25 जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. मनसुख हिरेन प्रकरणात अन्य आरोपींबरोबर समोरा-समोर चौकशी करण्यासाठी एनआयएने कोठडी मागितली होती.

12:35 June 21

राज्यानं केंद्रीय तपासयंत्रणेला सहकार्य करायल हवे - सीबीआय

हे संपूर्ण प्रकरण भ्रष्टाचाराशी संबंधित त्यामुळे त्याचा तपास होत असताना राज्य सरकारनं आक्षेप घ्यायचं कारणचं काय? उलट प्रत्येक राज्यानं केंद्रीय तपासयंत्रणेला सहकार्य करायल हवे. सचिन वाझेला पुन्हा सेवेत घेताच इतकं महत्त्वाचं पद का दिलं गेल? असा सवाल सीबीआयने कोर्टात केला आहे.

वाझेचा सहभाग सर्व महत्त्वाच्या प्रकरणात कसा होता? सरकारमधील नेत्यांबरोबर वाझेंची थेट उठबस कशी होती? या सर्व गोष्टी जोडलेल्या आहेत, त्यामुळे याचा तपास होणं आवश्यक आहे, असा युक्तीवाद सीबीआयचा हायकोर्टात केला आहे.

12:31 June 21

महाराष्ट्रात म्युकरामायकोसिस रुग्णांची एकूण संख्या 7998; तर 729 मृत्यू

महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असतानाच, म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य संसर्गही बळावत आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ७ हजार ९९८ म्युकरमायकोसिसचे रुग्ण बाधित झाले आहेत. तर एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत 729 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या महाराष्ट्रात 4 हजार 398 रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने याबाबतची माहिती दिली.


 

12:06 June 21

महाराष्ट्रात रविवारीपर्यंत 2 कोटी 76 लाख 99 हजार 419 नागरिकांचे लसीकरण

महाराष्ट्रात रविवारीपर्यंत 2 कोटी 76 लाख 99 हजार 419 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि.20 जून 2021 रोजी 1,13,045 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.

12:03 June 21

  • शरद पवार आणि सुप्रिया सुळे आज दिल्लीत
  • केंद्रातील विरोधी पक्ष नेत्यांची आज भेट घेण्याची शक्यता
  • शस्त्रक्रियेनंतर शरद पवार पहिल्यांदाच दिल्लीत

11:36 June 21

इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे- छगन भुजबळ

नाशिक- मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळाले पाहिजे यात दुमत नाही. सर्व पक्षांची हीच भूमिका आहे. मात्र कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता त्यांना आरक्षण मिळायला हवे ही माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका आहे. ओबीसी आक्रोश मोर्चा मराठा आरक्षण विरोधात नसल्याचेही मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी स्पष्ट केले. मराठा आणि ओबीसी दोघांचेही आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारलं आहे. कोरोनामुळं जनगणना झाली नाही आणि ओबीसी समाज कायद्याच्या कचाट्यात सापडला. मात्र दोन्ही समाजात वितुष्ट करण्याचा काहींचा प्रयत्न होत आहे. तो अयोग्य आहे.

शाहू,फुले,आंबेडकर आमची दैवते आहेत. मराठा आरक्षणाचा लढा देणारे खासदार संभाजीराजे छत्रपती हे अत्यंत समंजस आहेत. माझी विनंती आहे की, आपण न भांडता भारत सरकारला साकडं घालू,  कोर्टातील लढ्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीची नितांत गरज असल्याचेही मत भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले.

- निवडणूक आली की ओबीसी, मराठा विरोधात असा अपप्रचार होतो

- विधानसभेतही मी मराठा आरक्षण विषयाला पाठिंबा दिलाय

- छगन भुजबळ दुष्मन आहे असा अपप्रचार केला जातो

- एकत्र येऊन लढू यात, आपला लढा व्यवस्थेशी

- चर्चेशिवाय मार्ग नसल्याचे मतही छगन भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केले

11:35 June 21

मधुकर सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या थकीत वेतन प्रश्नी वंचितचे आंदोलन

 जळगाव - फैजपुरातील मधुकर सहकारी साखर कारखान्यातील कामगारांच्या थकीत वेतन प्रश्नी वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन सुरूच

-कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांच्या निवासस्थानाबाहेर सुरू आहे आंदोलन

-आंदोलक आणि चेअरमन, काही संचालकांमध्ये गेल्या तासाभरापासून चर्चा सुरू

-आंदोलक लेखी हमी घेण्याच्या मागणीवर ठाम

11:24 June 21

अनिल देशमुख विरोधातील गुन्हा रद्द करण्याची राज्य सरकारची याचिका; सुनावणी सुरू

सीबीआयनं अनिल देशमुखांविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी राज्य सरकारची हायकोर्टात याचिका

मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू

-मूळ तक्रारदार डॉ. जयश्री पाटील यांच्या युक्तिवादाला सुरुवात  

-राज्य सरकारची याचिका अयोग्य असल्याचा डॉ. जयश्री पाटील यांचा दावा

-याचिका फेटाळून लावण्याची हायकोर्टाकडे मागणी

या प्रकरणात तपास करताना माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याला प्रतिवादी करा, सचिन वाझे हा महत्वाचा दुवा अशल्याची अॅड जयश्री पाटील यांची मुंबई उच्च न्यायालयात मागणी

11:11 June 21

जळगाव - जिल्ह्यातील फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे पगार गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहेत, पगारासह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन, थकीत पगार, पीएफची रक्कम अदा करण्याची मागणी करण्यात येत आहे.

11:08 June 21

सरनाईक यांचे पत्र म्हणजे भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न -मुश्रीफ

कोल्हापूर-  प्रताप सरनाईक यांचे पत्र म्हणजे भाजपकडून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेस राष्ट्रवादी सेनेचे नेते फोडत आहेत, असे ते म्हणतात. पण राज्यात कोणतीही परिस्थिती नाही.

उलट महाविकासआघाडी कशी भक्कम होईल याबद्दल काँग्रेस राष्ट्रवादी प्रयत्न करत आहेत. केंद्रीय संस्था आणि इतर तपास संस्था त्यांना त्रास देत आहेत, हे अस्वस्थ करणारे आहे. मात्र आशा धमक्यांना शिवसेनेचे वाघ घाबरणार नाहीत. 

11:08 June 21

नाशिक मराठा क्रांती मोर्चा मुक आंदोलन  

पालकमंत्री छगन भुजबळ आंदोलन स्थळी दाखल

10:30 June 21

जुन्या पेन्शनसह अन्य मागण्यांसाठी परिचरिकांचे आंदोलन

10:29 June 21

संपूर्ण जगाला योगाचं महत्त्व कळलंय, कोरोनात रुग्णांना योगाचा मोठा फायदा - गडकरी

नागपूर- आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे, संपूर्ण जगाला योगाचं महत्त्व कळलंय, कोरोनात रुग्णांना योगाचा मोठा फायदा झाला आहे. मला सुद्धा योगाचा फायदा झाला. मी प्राणायाम करतो, त्याचा व्हिडिओ सोशल माध्यमात रोज करोडो लोकं बघतात. त्यामुळे प्रत्येकांनी योगा करायला हवा’ असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. आज नागपुरात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात केंद्रीय नितीन गडकरी सहभागी होत त्यांनी स्वत: योगा करत त्यांनी उपस्थितांचा उत्साह वाढवला.

10:24 June 21

राज्यातील तिन्ही पक्ष एकमेकांसोबत, हे सरकार चालवणे आमची जबाबदारी - संजय राऊत

राज्यात आम्ही तीन पक्ष एकमेकांसोबत उभे आहोत.  हे सरकार चालवणं आमची जबाबदारी आहे. मात्र, काही लोकांना सत्ता गेल्याने पोटात दुखत आहे. त्यामुळे केंद्र सरकार दबाब निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु याचा आम्हाला काही फरक पडणार नाही,हे  महाविकास आघाडी सरकार कसे चालवायच हे आमचं काम आहे. आम्ही ते व्यवस्थित चालवू, असे मत शिवसेना नेते संजय राऊीत यांनी व्यक्त केले.  प्रताप सरनाईक हे अडचणीत आहे आणि त्यांचं कुटुंब अडचणीत आहे .केंद्र सरकारच ED आणि इनकम टॅक्स खात त्यांना त्रास देत आहे. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घ्या, असे प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे, असेही राऊत या्वेळी बोलताना म्हणाले.

10:12 June 21

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्ली दौऱ्यावर

राज्याच्या राजकारणात काँग्रेस स्वबळाची भाषा करत असताना, तसेच उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतल्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत गेले आहेत. 

07:41 June 21

रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज

पुढील २ ते ३ तासात रायगड जिल्ह्यातील रोहा, अलिबाग याठिकाणी पुढील २ ते ३ तासात( सकाळी ९ वाजेपर्यंत) पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज मुंबईच्या हवामान वेधशाळेकडून वर्तविण्यात आला आहे.

06:46 June 21

नाशिकमध्ये आज मराठा आरक्षणासाठी मुक आंदोलन; लोकप्रतिनिधी राहणार उपस्थित

नाशिक - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नाशिकमध्ये आज मूक आंदोलन होणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनासाठी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका या आंदोलनात स्पष्ट करायची आहे. यावेळी मराठा आंदोलक काळे कपडे घालून या आंदोलनासाठी उपस्थिती लावत सरकारचा निषेध व्यक्त करणार आहेत.

06:15 June 21

शरद पवार-प्रशांत किशोर यांची दिल्लीत पुन्हा बैठक

मुंबईतील मालाड येथे एका प्लास्टिक गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे, अग्निशामक दल आणि पोलीस घटनास्थळावर दाखल आहेत. मास्टरजी कॉलनीमधील प्लास्टिक गोडाऊनला ही आग लागली होती. त्यानंर घटनास्थळी अग्निशामक दलाची ५ वाहने दाखल झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या प्लास्टिक गोदामाला लागलेल्या आगीत तेथील क्वारंटईन सेंटरदेखील जळाले असल्याची माहिती गो़डाऊन मालक हरेश लखनिया यांनी दिली.

Last Updated : Jun 21, 2021, 10:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details