मुंबई - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक आज दुपारी ११ वाजता होत आहे. या बैठकीत सरकारला अधिवेशनात विविध प्रश्नांवर कोंडीत पकडण्यासाठी आणि एकाच वेळी दोन्ही सभागृहात कोणते मुद्दे उपस्थित करायचे यावर रणनीती ठरवली जाणार आहे.
अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधक ठरवणार रणनीती; अकरा वाजता बैठक - विरोधी पक्षाची बैठक
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची आज दुपारी ११ वाजता बैठक होणार आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयासमोरील B-४ या शासकीय निवासस्थानी ही बैठक होणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे. बैठकीला विधानसभा आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षांचे गटनेते उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने सायंकाळी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या चहापानाला उपस्थित राहायचे की नाही यावर बैठकीत चर्चा होणार आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना राज्यात म्हणावे तसे यश मिळाले नाही. मात्र, तरीही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारला कोंडीत पकडून राज्यातील जनमानसात आपली पकड पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विशेषतः या अधिवेशनात शेतकरी, दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, बेरोजगारी, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, शिक्षणातील वाढलेली अनागोंदी, धनगर आणि इतर समाजातील आरक्षणाचे रखडलेले प्रश्न यासारख्या अनेक प्रश्नांवर सरकारला कोंडीत पकडण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे. त्याचा लाभ कसा घ्यायचा यासाठी ही बैठक महत्वाची असणार आहे.