मुंबई -राज्यात येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात प्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढत आहे. शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि नेते प्रवेश घेताना दिसत आहेत. आज पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेत प्रवेश केला.
प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी महेंद्र भानुशाली यांच्यासोबत साधलेला संवाद हेही वाचा -'राणे पिता-पुत्रांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गिफ्ट देण्याची कुवत राहिली नाही'
ठाणे आणि वसई, विरारमधील शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाला. यामध्ये सुनील यादव, राम कदम यांचे समर्थक आणि कार्यकर्त्यांचादेखील समावेश आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला.
500 उत्तर भारतीयांनी केला मनसेत प्रवेश -
चांदिवली विधानसभा क्षेत्रातील 500 उत्तर भारतीयांनी देखील आज मनसेत प्रवेश केला आहे. राज ठाकरे यांनी अयोध्याला जाणार अशी घोषणा केल्यानंतर आम्ही देखील त्यांना समर्थन करण्यासाठी आज या ठिकाणी पक्षप्रवेश करायला आलो आहोत, असे काही कार्यकर्त्यांनी सांगितले.
सत्तेत नसला तरी आमचा पक्ष हा अनेक समस्यांना तोंड फोडत असतो. आज फक्त मराठी माणूस नाही तर इतर भाषिक देखील मनसेत प्रवेश घेत आहेत आज आमच्या विधानसभेतील पाचशे उत्तर भारतीय नागरिकांनी मनसेत प्रवेश केला आहे. भविष्यातही असे प्रवेश होत राहतील, असे चांदोली विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी सांगितले.
हजारो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश -
मुंबई, पालघर, ठाणे या जिल्ह्यातून आज हजारो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. यापैकी काही कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेनेचे आहेत. लॉकडाऊनमध्ये मनसेचे काम पाहून हे कार्यकर्ते प्रभावित झाले आहेत आणि त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे. महानगरपालिकेत देखील मनसेची ताकद हे दाखवून देऊ, असेही मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले आहे.