पंढरपूर- मानाच्या दहा पालखी प्रमुखांबरोबर पोलीस प्रशासनाची चर्चा सुरू आहे. पंढरपूरपर्यंत चालत जाण्याची परवानगी द्या, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे. मात्र, आता अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची पालखी प्रमुखांबरोबर चर्चा सुरू आहे. वाखरीपासून 3 किमीपर्यंत 400 वारकरी चालत जाण्यास प्रशासनं परवानगी देणार आहे. मात्र, त्यापुढे पादूका बसनेच पंढरपुरात नेल्या जातील, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. वारकरी आणि पोलीस प्रशासनं यांच्यात बैठक झाली.
मुख्यमंत्री पंढरपुरात दाखल; पहाटे होणार श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा - मृतांचा आकडा
22:44 July 19
मानाच्या पालखी प्रमुखांबरोबर पोलीस प्रशासनाची चर्चा; पंढरपूरपर्यंत चालत जाण्याची वारकऱ्यांची मागणी
22:36 July 19
मुख्यमंत्री पंढरपुरात दाखल; पहाटे होणार श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा
पंढरपूर - आषाढी एकादशीची श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज (19 जुलै) पंढरपुरात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री दुपारी तीनच्या सुमारास मुंबईतून पंढरपूरसाठी निघाले होते. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरेदेखील आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: गाडी चालवत पंढरपुरात पोहचले आहेत.
कोरोनाच्या सावटामुळे सलग दुसऱ्या वर्षी आषाढी यात्रेचा सोहळा प्रतिकात्मक साजरा होणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर, श्री संत तुकाराम महाराजांसह विविध नऊ संतांच्या पालख्या ठिकठिकाणाहून पंढरपुरात बसमधून दाखल झाल्या आहेत.
21:55 July 19
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपुरात दाखल
पंढरपूर -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंढरपुरात दाखल झाले आहेत. पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवून दाखल झाले आहेत. आठ तासाच्या प्रवासानंतर मुख्यमंत्री पंढरपुरात पोहचले आहेत. विठ्ठलाची महापूजा पहाटे दोनच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. रश्मी ठाकरे देखील पंढरपुरात दाखल झाल्या आहेत.
19:16 July 19
नागपूर; मृत मनोज ठवकर यांच्या कुटुंबीयांची राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतली भेट
नागपूर - पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या दिव्यांग मनोज ठवकर यांच्या कुटुंबीयांची राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट घेतली आहे. नाकेबंदी दरम्यान मास्क घातले नाही, हेल्मेट नाही या कारणामुळे झालेल्या बाचाबाचीतून संतापलेल्या पोलिसांनी मनोजला जबर मारहाण केली होती, ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होता, असा आरोप कुटुंबीयांनी केला होता. या घटनेनंतर मनोज ठवकर राहत असलेल्या पारडी परिसरात पोलिसांच्या विरोधात जनतेचा मोठा रोष दिसून आला होता.
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनीही ठवकर कुटुंबीयांची भेट घेतली होती. तर आज शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू महाराष्ट्र सरकारच्यावतीने ठवकर कुटुंबियांना भेटले. या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे तसेच दोषी असल्यावर पोलिसांविरोधात कठोर कारवाईचे आश्वासन मंत्री बच्चू कडू यांनी ठवकर कुटुंबीयांना दिले आहे.
18:57 July 19
ठाण्यात दरड कोसळली, एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
ठाणे - दुर्गा चाळ, गोलाई नगर, चर्च रोड, कळवा पूर्व येथे भूस्खलन झाले आहे. यात दरड कोसळून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोघांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. त्यांना ठाणे (प) येथील कळवा मधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दुर्घटनास्थळी आरडीएमसी, टीडीआरएफ टीम आणि अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले आहे.
18:51 July 19
राज्यपाल राज्य सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावावर उत्तर देण्यास बांधिल नाही; केंद्र सरकारचा हायकोर्टात दावा
मुंबई - राज्यपाल राज्य सरकारनं पाठवलेल्या प्रस्तावावर उत्तर देण्यास बांधिल नाही, असा दावा केंद्र सरकारने हायकोर्टात केला आहे. तर, मग अशा परिस्थितीत या समस्येवर उपाय काय? असा प्रश्न हायकोर्टाने विचारला आहे. आठ महिने उलटले तरी विधानपरिषदेवर 12 नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती झाली नाही. यासंदर्भात नाशिकचे रहिवासी रतन सोली यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
17:55 July 19
नेरळ-माथेरान मार्गावरील घाटात दरड कोसळली
रायगड - नेरळ ते माथेरानला जाणाऱया घाटात मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे. त्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
17:50 July 19
एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीत वाढ
पुणे - भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. गिरीश चौधरी यांना 20 जुलैपर्यंत ईडीच्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे.
17:34 July 19
ईडीने तात्पुरत्या स्वरूपात कुटुंबाची संपत्ती जप्त केली - अनिल देशमुख
नागपूर - ईडीने तात्पुरत्या स्वरूपात माझ्या कुटुंबाची ४ कोटी २० लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. माझा मुलगा सलिल याने दोन कोटी ६७ लाखांमध्ये २००५ साली संपत्ती विकत घेतली होती. काही प्रसार माध्यमात तीनशे कोटी रुपये संपत्ती असल्याचा दावा केला होता, तो धादांत खोटा असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.
ईडीची नोटीस मिळाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात मी याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेचा निकाल आल्यानंतर स्वतः ईडी कार्यालयात जाऊन जबाब नोंदवणार असल्याचे अनिल देशमुख म्हणाले आहेत.
16:31 July 19
यशराज बॅनरखाली निर्मित पृथ्वीराज चव्हाण चित्रपट वादाच्या भोवऱ्यात
नागपूर - यशराज बॅनरखाली निर्मित पृथ्वीराज चव्हाण हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. अक्षय कुमार यांची मुख्य भूमिका असलेल्या पृथ्वीराज चव्हाण चित्रपटामध्ये जर इतिहासासोबत छेडछाड केली, तर त्याला राजपूत संघटना विरोध करेल. चित्रपट गृहात हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल तिथे तोडफोड केली जाईल,असा इशारा आज नागपूरमध्ये राजपूत क्षत्रिय सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला.
15:46 July 19
आषाढी एकादशीच्या पूजेसाठी मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेसाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे मातोश्री निवासस्थानावरुन पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. मंगळवारी पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबासह विठ्ठल-रखुमाईची पूजा करणार आहेत.
14:57 July 19
आषाढी एकादशीच्या पूजेसाठी मुख्यमंत्री आज पंढरपूरला होणार रवाना
मुंबई -आषाढी एकादशीच्या पूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंढरपूरसाठी निघणार आहेत. दुपारी तीन वाजता विमानाने ते साताऱ्याला रवाना होणार आहेत. उद्या पहाटे विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
13:16 July 19
पेगॅसस कांड महाराष्ट्रात ही झाले का? याची चौकशी करा- सचिन सावंत
पेगॅसस कांड महाराष्ट्रात ही झाले का? याची चौकशी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने करावी अशी मागणी आहे. महाराष्ट्रात या आधीच फडणवीस सरकारच्या काळातील रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून अनधिकृत फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले आहे. परंतु पेगॅसिस सॉफ्टवेअर च्या वापराच्या बातम्या ही येत होत्या. कोणी IPS अधिकारी मंत्रालयात बसून या विषयावर काम करत होता का? DGIPR अधिकारी कोणाच्या परवानगीने इस्त्रायल ला गेले? कोणते प्रशिक्षण त्यांनी घेतले? परत येऊन अहवाल दिला का? पेगॅससशी यांचा संबंध आहे का? निवडणूक काळात प्रचाराचे काम सोडून असे दौरे होणं आश्चर्यकारक व संशयास्पद आहे.
कितींदा कोण अधिकारी इस्त्रायल ला गेले? NSO बरोबर शासकीय मिटींग झाल्या होत्या का? NSO शी कोणता पत्रव्यवहार झाला होता का? हे सर्व समोर आले पाहिजे. या अगोदर ही अशा चौकशीची मागणी करण्यात आली होती,अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.
12:34 July 19
मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू
मुंबई - विक्रोळी आणि कांजूरमार्ग रेल्वे स्थानकादरम्यान पावसाचे पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिट लोकल वाहतूक ठप्प केली होती
आता धीम्या गतीने लोकल सेवा सुरू आहे
12:25 July 19
तेलंगणा काँग्रेसचे प्रेदशाध्यक्ष रेवनाथ रेड्डी हैदराबाद पोलिसांच्या नजर कैदेत
हैदराबाद - तेलंगणा काँग्रेसचे नेते रेवनाथ रेड्डी यांना हैदारबाद पोलिसांनी सोमवारी पहाटे नजरकैद केले आहे. रेड्डी यांच्या कार्यालयाकडून ते संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्लीला जायचे होते असे सांगण्यात आले. मात्र, रेड्डी यांना आज पहाटेच त्यांच्या घरातच नजर कैद करण्यात आले आहे
12:24 July 19
रिफायनरी प्रकरणी शिवसेनेला झटका, जिल्हा परिषद सदस्यासह 100 कार्यकर्त्यांचा आज भाजपा प्रवेश
रत्नागिरी- रिफायनरीच्या मुद्यावरून बालेकिल्ल्यात शिवसेनेला आणखी एक धक्का बसला आहे. रिफायनरी समर्थनार्थ शिवसैनिकांनी शिवसेनेला 'सोड चिठ्ठी द्यायला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या सागवे विभागातील जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर, माजी चार शाखा प्रमुख याच्यासह 100 कार्यकर्त्यांचा आज शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. राजापूर तालुक्यातील संपूर्ण गोवळ ग्रामपंचायत शिवसेनेतून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गोवळ ग्रामपंचायत सध्या शिवसेनेच्या ताब्यात आहे. मंदा शिवलकर यांनी रिफायनरीला समर्थन केल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी झाली होती.
-----
12:24 July 19
मुंबई - एकादशीच्या पूजेसाठी मुख्यमंत्री आज पंढरपूरला जाणार आहेत. दुपारी तीन वाजता वाहनाने सोलापुरला रवाना होणार आहेत. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीची परंपरेनुसार मुख्यमंत्री पूजा करणार आहेत.
09:59 July 19
विक्रोळीतील बचावकार्य थांबवले, 10 जणांचा मृत्यू झाला
09:43 July 19
कसारा घाटात दरड कोसळली; इगतपुरीला जाणारी रेल्वे वाहतूक बंद
09:24 July 19
नागपुरात पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज
नागपूर - नागपूरसह विदर्भात आज मान्सून सक्रिय होऊन मुसळधार पावसाचा अंदाज. विदर्भात पुढील 48 तास पावसाचे असल्याचा अंदाज नागपूर वेध शाळेने व्यक्त केला आहे.
09:20 July 19
मेळघाटात अंधश्रद्धेतून आणखी एका आदीवासी महिलेचा मृत्यू, संर्पदंशावर उपचारासाठी गाठला भोंदूबाबा
अमरावती- मेळघाटात अंधश्रद्धेतून आणखी एका आदीवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. टेम्ब्रूसोडा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत जामली येथे सर्पदंशावर उपचारासाठी भूमका (भोंदूबाबा) कडे उपचारासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू झाला आहे. फुलवंती कासदेकर वय30 वर्ष असं मृत महिलेचं नाव आहे. घरातच महिलेला सर्पदंश झाला होता.
08:53 July 19
पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज, प्रशासनास सतर्कतेचे आदेश
मुंबई- पुढच्या चोवीस तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मुंबईसह कोकणाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई उपनगरांत पावसाचा जोर कायम असून सध्या रस्ते वाहतूक आणि लोकल सेवा सुरळीत सुरू आहेत. मुंबईत थंड वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत.
- रविवार सकाळी 8 ते आज (सोमवार) सकाळी 8 वाजेपर्यंत
24 तासात शहर 48.88 मिमी, पश्चिम उपनगर 51.89 मिमी, पूर्व उपनगर 90.65 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे
08:12 July 19
गोव्यातील कर्फ्यू 26 जुलैपर्यंत वाढवला
पणजी- गोवा राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या राज्यव्यापी कर्फ्यूत 26 जुलै सकाळी सात वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे, याबाबतची माहिती रविवारी उशिरा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ट्विटरद्वारे दिली.
08:11 July 19
संत मुक्ताबाई पालखी सोहळा मुक्ताईनगर येथून शिवशाही बसने पंढरपूरला रवाना
जळगाव - आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखी सोहळा मुक्ताईनगर येथून शिवशाही बसने पंढरपूरला रवाना
कोरोनामुळे 40 वारकरी संत मुक्ताईंच्या पादुका घेऊन आषाढी एकादशीच्या वारीसाठी रवाना
आज पहाटे 4 वाजता नवीन मंदिरात पूजा-अर्चा झाली. त्यानंतर पादुका पंढरपूरला रवाना
06:35 July 19
उत्तराखंडमध्ये ढगफुटी, तीन ठार, चार जण बेपत्ता
उत्तर काशी जिल्ह्यातील मंडो येथे ढगफुटीची घटना घडली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य 4 जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाकडून याबाबतची माहिती देण्यात आली.
06:11 July 19
मध्य रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा पूर्ववत सुरू
मुंबई - शनिवारपासून मुंबईत झालेल्या अतिवृष्टीने 30 जणांचे बळी घेतले. या पावसामुळे मुंबईत अनेक भागात पाणी साठल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे रस्ते आणि रेल्वे वाहतूक प्रभावित झाली होती. दरम्यान आज मध्य रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवा पूर्ववत सुरू झाली आहे. तर मुंबई शहर आणि उपनगरात आजही अतिवृष्टीचा इशारा हवामाान विभागाकडून देण्यात आला आहे.