मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मालिक ( Minister Nawab Malik ) यांना आज मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी ईडीने केलेले युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने नवाब मलिक यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली असून 7 मार्चपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचे आदेश ( Nawab Malik ED Custody ) दिले आहेत.
ईडीच्या वकिलांचा न्यायालयात युक्तीवाद -पीएमएलए न्यायालयात युक्तीवाद करताना ईडीने 6 दिवसांच्या कोठडीची मागणी केली. ईडीतर्फे अॅड. अनिल सिंग यांनी युक्तीवाद केला. नवाब मलिक रुग्णालयात दाखल असल्याने चौकशी करता आली नाही. त्यामुळे आणखी 6 दिवसांच्या कोठडीची मागणी ईडीतर्फे करण्यात आली. ईडीकडून अॅड. सिंगमार्फत न्यायालयात सांगण्यात आले की, आरोपी सरदार शहवली खान याने दिलेल्या जबाबातील तपशील पाहता नवाब मलिक यांची अधिक चौकशी करायची आहे. त्याचबरोबर या प्रकरणात आम्ही आणखी काहींचे जबाब नोंदवले आहेत. पूर्वीच्या अर्जात वेगवेगळे व्यवहाराची माहिती नमूद आहेत. कारागृहात असलेल्या दोशीचा जबाब, मालकीण असलेली मुनिराचा जबाबही पूर्वीच्या अर्जात आहे. या संदर्भात मलिक यांची चौकशी करायची आहे, असे अॅड. अनिल सिंग यांनी ईडीच्या वतीने न्यायालयात म्हटले.
कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतले जाऊ शकत नाही- ईडीने ठोस पुरावे न्यायालयात आणायला हवे होते. योग्य गृहपाठ करायला हवा तसे न करता आणि ठोस पुरावे न देता अशाप्रकारे कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेतले जाऊ शकत नाही.सर्वोच्च न्यायालयाने व्यक्तिगत स्वातंत्र्याविषयी वारंवार स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. पुराव्यांशी छेडछाड होऊ द्यायची नसते. पण, न्यायालयात काही होण्याऐवजी न्यायालयाच्या बाहेरच होताना दिसते आहे. अशाप्रकारे तर मलिक यांच्याशी शत्रुत्त्व असलेले कोणीही उभे राहील आणि जबाब देतील. असे अन्य कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत होत राहील, असा युक्तीवाद नवाब मलिक यांचे वकील अमित देसाई यांनी केला.
55 लाखचे 5 लाख रोख वाचावे - मुनिराच्या मालकीची जमीन हसीना पारकरने बळकावून नवाब मलिक यांना दिली. त्याविषयी पारकर आणि मलिक यांच्यात रोख आणि धनादेशाच्या स्वरुपात व्यवहार झाला हे स्पष्ट आहे. पारकरला 55 लाख रुपये रोख दिल्याचा उल्लेख आम्ही पहिल्या रिमांड अर्जात केला होता. त्यात एक चूक झाली होती. त्याऐवजी पाच लाख रुपये रोखीत दिले, असे वाचावे. टायपींग करताना चूक झाल्याने 5 चे 55 झाले, असे आजच्या रिमांड अर्जात ईडीकडून म्हणण्यात आले होते.
चुकीमुळे मलिक यांना ईडी कोठडीत रहावे लागले -55 लाख हसीना पारकरला दिल्याचा दावा करण्यात आला, टेरर फंडिंगचा आरोप केला, आता मात्र ईडी सांगत आहे की टाईप करताना चूक झाली आहे. आजच्या अर्जात 55 ऐवजी 5 लाख म्हणत आहे. ईडीच्या चुकीमुळे मलिक यांना ईडी कोठडीत इतके दिवस काढावे लागले. ईडीने नीट गृहपाठ करावा, असा युक्तिवाद नवाब मलिक यांचे वकिल अॅड अमित देसाई यांनी केला.