मुंबई -मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी होत होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये 6 ते 11 हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. काल सोमवारी 6 हजार 905 नवे रुग्ण आढळून आले होते. त्यात आज वाढ झाली असून, 7898 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 11 हजार 264 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी
मुंबईत आज 7 हजार 898 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 लाख 35 हजार 017 वर पोहोचला आहे. आज 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 12 हजार 86 वर पोहोचला आहे. 11 हजार 263 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 4 लाख 34 हजार 941 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 86 हजार 866 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी 38 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 89 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 970 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 46 लाख 99 हजार 507 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हे विभाग आहेत हॉटस्पॉट
मुंबईत अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे, मालाड, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, घाटकोपर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.