मुंबई -मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे रुग्ण संख्या कमी झाली होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी तीन हजारावर रुग्ण आढळून आले असून, वर्षभरातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. आज 3512 नवे रुग्ण आढळून आले असून, 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या आधी 18 मार्चला 2877, 19 मार्चला 3062, 20 मार्चला 2982, तर 21 मार्चला 3775 रुग्णांची नोंद झाली होती.
मुंबईत आज सर्वाधिक रुग्णांची नोंद
मुंबईत आज 23 मार्चला 3512 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 69 हजार 426 वर पोहोचला आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याने, मृतांचा आकडा 11 हजार 600 वर पोहोचला आहे. तर 1203 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 29 हजार 234 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 27 हजार 672 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी 90 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 38 चाळी आणि झोपडपट्ट्या प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 363 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 37 लाख 54 हजार 100 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
हे विभाग आहेत हॉटस्पॉट
मुंबईत बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.