मुंबई : आर्यन खान तसेच समीर वानखेडे प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी एक ट्विट केल्याने नवीनच चर्चा सुरू झाली आहे. कवडीमोल किंमतीची लोकं आपले गुणगान गातात तिथे शांत राहिले पाहिजे असे ट्विट राऊत यांनी केले आहे.
संजय राऊत यांचे ट्विट
"उस जगह हमेशा खामोश रहा करो, जहाँ दो कौडी के लोग अपना गुण गाते हो" असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. जिथे कवडीमोल किंमतीचे लोक आपले गुणगान गातात तिथे नेहमी शांत राहिले पाहिजे असा या ट्विटचा अर्थ होतो. दरम्यान, राऊत यांच्या या ट्विटवरून आता नवीन चर्चेला सुरूवात झाली आहे.
पवार यांची भेट घेतल्यानंतर ट्विट
संजय राऊत यांनी सकाळीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली होती. यावेळी दोघांमध्ये राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीच्या काही वेळानंतर राऊत यांनी हे ट्विट केले आहे.
राऊत यांचा निशाणा कुणावर
सध्या राज्यात वानखेडे प्रकरणावरून मंत्री नवाब मलिक सातत्याने नवनवीन खुलासे करत आहेत. याचदरम्यान, त्यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष्य केले. त्यामुळे फडणवीस विरोधात मलिक असे राजकीय चित्र सध्या राज्यात उभे राहिले आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर राऊत यांनी केलेले हे ट्विट कुणाला उद्देशून आहे अशी चर्चा होत आहे.
पुढे काय खुलासे होणार?
मागील महिन्यात सुरू झालेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला वेगळेच वळण लागले. या प्रकरणात मोहित भारतीय नंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील उडी मारली आहे. फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे आणखी काय खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी संजय राऊत यांनी या प्रकरणात इंटरवलनंतर मी पटकथा लिहिणार असल्याचे म्हटले होते.