मुंबई - शिवसेना नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावला आहे. येत्या मंगळवारी (२९ डिसेंबर) वर्षा राऊत यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे. केंद्रीय संस्था भाजपच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या झाल्या असून या इडी कार्यालयाला टाळे ठोकायची वेळ आली असल्याचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे.
सुडापोटी कारवाई -
केवळ केंद्र सरकारच्या विरोधात बोलले म्हणून त्यांच्यावर सुडापोटी कारवाई करण्यात येत आहे. भाजपचे हे अतिशय खालच्या पातळीचे राजकारण आहे. आताच्या घडीला देशात फार चुकीचे पायंडे पाडले जात असून भाजप सरकारी संस्थांचा गैरवापर करत आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांचा पीएमसी बँके घोटाळ्याशी कोणताही संबंध नसताना त्यांना यात गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सावंत यांनी सांगितले. मात्र अशा नोटिशीला शिवसेना भीक घालत नाही, याला चोख उत्तर दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
नोटीस पाहिल्यानंतर प्रतिक्रिया देणार - संजय राऊत
दरम्यान या प्रकरणी संजय राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, मी सध्या मुंबईच्या बाहेर आहे व ईडीची नोटीस आल्याची कोणतीही माहिती नाही, नोटीस पाहिल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यावर प्रतिक्रिया दिली जाईल, असे सांगितले. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून काही जणांची चौकशी सुरू आहे. याच प्रकरणाच्या चौकशीत वर्षा राऊत यांचं नाव समोर आल्याने, त्यांना समन्स बजावण्यात आलेले आहे.