वसई Massive explosion in Vasai factory: वाकीपाडा येथील इंडूजा कंपनीत भीषण स्फ़ोट झाला आहे. या घटनेत ३ कामगार ठार तर १० ते १२ कामगार जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते
नायगाव पूर्वेतील वाकीपाड्यातील इंडुजा कंपनीत हायड्रोजन सिलेंडरचा भिषण स्फोट होऊन 3 कामगारांचा भाजून मृत्यू झाल्याची तर 10 ते 12 कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेनंतर वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
या घटनेत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारच्या सुमारास झालेल्या या स्फोटाची तिव्रताच इतकी होती की, या स्फोटामुळे आजुबाजूच्या घरातील काचेच्या खिडक्यांना तडा गेल्या आहेत. तर स्फोटाचा आवाज तब्बल 1 किलोमिटर परिसरातपर्यंत ऐकायला गेला आहे.
हायड्रोजन सिलेंडरचा भीषण स्फोट नायगाव पूर्वेतील वाकीपाडा, पाझर रोड लगत सदरची कंपनी आहे. या कंपनीत एकूण 50 कामगार कामावर आहेत. मात्र घटनेच्या दिवशी केवळ 25 ते 30 कामगार उपस्थित होते. दुपारच्या सुमारास हायड्रोजन सिलेंडरचा स्फोट होऊन यात 3 कामगार जागीच दगावले आहेत. तर 10 ते 12 कामगार गंभीर आहेत.
मृत्तांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांकडून सांगण्यात येते. दरम्यान, वाकीपाड्यात अनधिकृत कारखाने, औद्योगिक गाळे बेसुमाररित्या वाढत आहेत. कामण, चिंचोटी, पोमण, कोल्ही, देवदळ, बापाणे, राजावली या परिसरात हे कारखाने स्थिरावले आहेत. कारखान्यांत औद्योगिक सुरक्षा धाब्यावर बसवून उत्पादनप्रक्रिया राबवली जात असल्याचे चित्र समोर येते.
दरम्यान, आजच्या दुर्घटनेनंतर वसईच्या प्रदुषणाला हातभार लावणार्या कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष का होते आहे, यामागे काही अर्थपूर्ण धागेदोरे आहेत याची चौकशी या घटनेनंतर होणे संयुक्तिक असल्याचे आवाहन सुज्ञ नागरिकांनी केले आहे. वसईतील कारखाने आणि औद्योगिक सुरक्षा हा प्रश्न नेहमीच ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर स्थानिक ग्रामपंचायतीच्या कारभारावरदेखील टिका होऊ लागली आहे.
अग्निपरिक्षण, उद्वाहन परिक्षण, विद्यूत संच मांडणी परिक्षण व औद्योगिक सुरक्षा वार्यावर :विरारच्या विजय वल्लभ दुर्घटनेनंतर वसईतील अग्निपरिक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र सदर प्रकरण थंड झाल्यानंतर अग्निपरिक्षणासारखा मुद्दा शासकीय दरबारी पुन्हा धुळखात पडला आहे. त्याचबरोबर उद्वाहन परिक्षण, विद्युत संच मांडणी या मुद्दांनाही धुळ बसली आहे. वाकीपाडा दुर्घटनेनंतर वसईतील प्रदुषणकारी, धोकादायक कारखाने आता तरी बंद होतील का? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.