महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनामुळे तीन मंत्र्यांचे कार्यालय तात्पुरते 'लॉकडाऊन' - mumbai corona news

मंत्रालयातील मंत्री कार्यालयात राज्यातून लोक कामासाठी येतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय करण्यात येत आहे. मंत्रालयात याआधी देखील ज्येष्ठ अधिकारी कोरोनाबाधित आढळले होते. त्यानंतर मंत्रालयात निर्जंतुकीकरण करण्यात आले होते.

mantralaya
मंत्रालय

By

Published : Sep 12, 2020, 6:38 PM IST

मुंबई- कोरोना संकटामुळे तब्बल दोनवेळा लांबलेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन पार पडल्यावर मंत्री आणि मंत्र्यांच्या कार्यालयातील अनेक कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. मंत्रालयात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने मंत्रालयातील तीन मंत्री कार्यालये तात्पुरती बंद करण्यात आली आहेत.

पावसाळी अधिवेशनानंतर सहकार आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम कोरोनाबाधित झाले. अधिवेशनापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले देखील कोरोनाबाधित झाले होते. अधिवेशनाच्या वेळी देवेंद्र भुयार, राहुल नार्वेकर, गोपीचंद पडळकर, प्रवीण पोटे या आमदारांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या कार्यालयातील कर्मचारी कोरोनाबाधित आढळले, तर उदय सामंत यांच्याही कार्यालयातील कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत.

आज छगन भुजबळ यांच्या कार्यालयातील सहा अधिकारी आणि कर्मचारी पॉझिटिव्ह आले. तर, ऊर्जामंत्री यांच्या कार्यालयातील 10 अधिकारी, कर्मचारी, घरात काम करणारा स्वयंपाकी देखील पॉझिटिव्ह आले. कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने छगन भुजबळ यांनी होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. नितीन राऊत मात्र बैठकांना हजेरी लावत आहेत. असे असले तरी, मंत्र्यांच्या स्टाफला कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांचे कार्यालय तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.

शुक्रवारी राज्यात सर्वाधिक 24 हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. मंत्रालयातील मंत्री कार्यालयात राज्यातून लोक कामासाठी येतात. त्यामुळे खबरदारीचा उपाय करण्यात येत आहे. मंत्रालयात याआधी देखील ज्येष्ठ अधिकारी कोरोनाबाधित आढळले होते. त्यानंतर मंत्रालयात निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी सर्व सदस्य मंत्री आणि मंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग ठेवत आणि योग्य ती खबरदारी घेत अधिवेशनाची सांगता झाली असली तरी आता कोरोनाच्या विळख्यात राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले मंत्रालय सापडले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details