मुंबई- चेंबूर येथील एका खासगी रुग्णालयाच्या चुकीमुळे प्रसूती झालेल्या महिलेला आणि तिच्या 3 दिवसाच्या नवजात बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहे. याबाबतची बातमी सर्वात आधी 'ई टीव्ही भारत' ने दिली होती. याची दखल घेत आरोग्य विभागाने हे रुग्णालय सील केले आहे. या प्रकरणी रुग्णालयाने हलगर्जीपणा केला का, याची चौकशी करून कारवाई केली जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
चेंबूर नाका येथील साई हॉस्पिटलमध्ये रुग्ण ऍडमिट होता. त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यावर त्याला इतर रुग्णालयात हलवण्यात आले. कोरोनाचा रुग्ण आढळून आला तरी त्या रुग्णालयात निर्जंतुकीकरण न करताच इतर रुग्णांवर उपचार केले गेले. या रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समजते. रुग्णलयातील कोरोनाचा रुग्ण असलेल्या विशेष वॉर्डमध्येच निर्जंतुकीकरण न करताच एका प्रसूती होणाऱ्या महिलेला ठेवण्यात आले. सिझेरियनद्वारे त्या महिलेला बाळ झाले. मात्र, रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे त्या प्रसूती झालेल्या महिलेला आणि त्याचा नवजात बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची सर्वात आधी बातमी ई-टीव्ही भारतने दिली होती.