मुंबई -केंद्राच्या नव्या शेतकरी कायद्याविरोधात दिल्लीच्या वेशीवर पंजाब हरियाणा येथील शेतकरी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. केंद्राने केलेल्या नव्या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर कायद्याला विरोध करण्यासाठी येत्या 3 जानेवारीला महाराष्ट्रातून हजारो शेतकरी दिल्लीला जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभा यांच्यावतीने पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे.
केंद्राच्या विरोधात शेतकरी एकवटले
26 नोव्हेंबरपासून दिल्लीच्या बॉर्डरवर देशातील शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. केंद्राने मंजूर केलेले तीन नवे कृषी कायदे हे शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने हे कायदे मागे घ्यावेत. एम एस पी कायदा रद्द करावा अशा विविध मागण्या या शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आल्या आहेत. गेल्या एक महिन्यांपासून दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता राज्यातून देखील हजारो शेतकरी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 3 जानेवारीला दिल्लीमध्ये जाणार आहेत.