मुंबई - कोरोना असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. त्यानंतर आता येत्या १७ ऑक्टोबरपासून सुरू होणारा नवरात्रोत्सवही साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्याबाबत राज्याच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून या वर्षीच्या नवरात्रीत गरबा, दांडिया खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा -मुंबईमधील हिरे व्यवसायावर कोरोनाची पडछाया; 250 व्यापाऱ्यांनी सुरतमध्ये हलविली दुकाने
कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, या वर्षीचा नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, दसरा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. तसेच मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
या वर्षीचा नवरात्रोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट त्या अनुषंगाने करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत. शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी शिबिरं आयोजित करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.