मुंबई - कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. यापार्श्वभूमीवर सध्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. काही प्रमाणात या जिल्ह्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, पुढच्या काही दिवसांत अनेक सण येऊन ठेपले आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे परिणाम यावेळी जाणवतील, अशी धास्ती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. यावेळी नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही टोपे यांनी केले.
तीव्रता कमी करण्यासाठी त्रिसूत्री पाळा -
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तिसरी लाट थोपवायची असेल तर आपल्याला काळजी घ्यावी लागेल असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्याची री ओढली आहे. जगात स्पेन, युके, रशिया, इंडोनेशिया मध्ये कोरोनाची तिसरी लाट आलेली आहे. लसीकरण झालेल्या देशात तिसऱ्या लाटेचा धोका कमी प्रमाणात जाणवला आहे. लसीकरण करणे महत्वाचे आहे. भारतातल्या तिसऱ्या लाटेबाबत अद्याप अंदाज आलेला नाही. महाराष्ट्रात आगामी काळात सणवार खूप आहेत. त्यामुळे बेसावध राहून चालणार नाही. तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करायची असेल, शासनाच्या त्रिसुत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. शिवाय, लसीकरणही महत्वाचे आहे. जर तिसऱ्या लाटेला थोपवायचे असेल, तर काळजी घेण्याची गरज आहे, असे आवाहन आरोग्य टोपे म्हणाले.